मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी (१५ डिसेंबर) हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याला तातडीने मुंबईतल्या अंधेरीमधील वेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि श्रेयसची अँजिओप्लास्टीही करण्यात आली आहे. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिरावली असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदेने दिली आहे. सोशल मीडियाद्वारे दिप्तीने एक पोस्ट शेअर करून अभिनेत्याच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे.
दिप्ती तळपदेने सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले, अविश्वसनीय समर्थन आणि शुभेच्छांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. तुमच्या सर्वांचे मेसेज हे माझा आधार राहिले. मी कदाचित वैयक्तिकरित्या उत्तर देऊ शकली नसेल, परंतु प्रत्येकाचे मनापासून धन्यवाद'. श्रेयसला डिस्चार्ज मिळाल्याने त्याचे चाहते आनंदी झालेत.
श्रेयस त्याच्या आगामी 'वेलमक टू जंगल' सिनेमाचं शूटिंग करत होता. त्याने गुरुवारी सिनेमातील काही अॅक्शन सीक्वेन्स शूट केले होते. दिवसभर तो शूटिंग करत होता आणि त्याची प्रकृती उत्तम होती. पण शूटिंग संपल्यानंतर तो घरी आला, घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याच्या पत्नीने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. अभिनेता बॉबी देओलनेही श्रेयसच्या तब्येतीविषयी दोन दिवसांपूर्वी माहिती दिली होती. श्रेयसच्या हृदयाचे ठोके 10 मिनिटांसाठी थांबले होते असं तो म्हणाला होता.