श्रेयस तळपदेची भूमिका असलेला 'कर्तम् भुगतम्' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात त्याच्यासोबत विजय राज प्रमुख भूमिकेत आहे. त्यानिमित्ताने ज्योतिषशास्त्र आणि सिनेमाविषयीचा अनुभव कसा होता, याविषयी श्रेयसशी केलेली ही बातचीत...
>> देवेंद्र जाधव
'कर्तम् भुगतम्' सिनेमाचं कथानक आणि भूमिका काय?
'कर्तम् भुगतम्' सिनेमा हा बेसिकली सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. देव जोशी नावाच्या एका माणसाची गोष्ट आहे. जो मूळचा भोपाळचा असून सध्या न्यूझीलंडमध्ये स्थायिक आहे. तो आता काही कामानिमित्त पुन्हा भोपाळला आलाय. तो तेव्हा भोपाळला येतो तेव्हा त्याला एक ज्योतिष सांगतो की, 'तू आता परत नाही जाऊ शकत'. देव जोशीला यावर विश्वास नाही. मग पुढे अशा काही घटना घडतात की, त्याच्या परत जाण्यामध्ये समस्या निर्माण होतात. त्यामुळे तो इथे अडकला जातो. तर तो का अडकतो? त्याच्या कर्मांमुळे त्याला शिक्षा मिळते का? या प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा सिनेमा आहे. सिनेमात ट्विस्ट अँड टर्न घडत जातात. त्यामुळे पुढे कळतं की, देव जोशी सोबत खरंच नेमकं घडलंय?
ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे का?
खूप जण ज्योतिष शास्त्राला अनुसरून खडे म्हणा, धागे म्हणा, माळा म्हणा अशा बऱ्याच गोष्टी करत असतात. कारण आपलं चांगलं व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं असतं. माझा अनुभव सांगायचा तर २००० साली माझं मराठी मालिकांमध्ये काम व्यवस्थित चालू होतं. त्यावेळी माझा मित्र म्हणाला की, 'एक गुरुजी कोणते खडे घालायचे ते सांगतात. त्यामुळे अजून भरभराट होते.' आम्ही त्या गुरुजींकडे गेलो आणि त्यांनी माझी पत्रिका बघितली. त्यावेळी फार पैसे नसायचे तरीही गुरुजींनी सांगितलं म्हणून म्हणून 'गुरू'चा खडा असलेली अंगठी करून घेतली. तो खडा घातल्यानंतर काहीच दिवसांनी मला चंद्रकांत कुलकर्णी यांचा 'भेट' हा आयुष्यातला पहिला सिनेमा मिळाला. मला वाटलं अंगठी घातल्यानंतर चांगला बदल घडला. आता मला जास्त कामं मिळतील. पण त्यानंतर मात्र सगळी कामं बंद पडत गेली. पुढे लोकांनी सांगितलं म्हणून खडा वेगवेगळ्या ठिकाणी घालण्याचा प्रयोग केला. पण पुढच्या दोन अडीच वर्षांमध्ये करिअरमध्ये डाऊनफॉल झाला. पुढे मी वैतागून ती अंगठी काढणार होतो. मग दीप्ती म्हणाली, "फक्त खडा फेक अंगठी फेकू नको. कारण अंगठी सोन्याची आहे." 'कर्तम् भुगतम्' सिनेमात डायलॉग आहे त्याप्रमाणे, 'आपल्या नशीबात जे लिहिलं तेच मिळणार आहे'. त्यामुळे काम करणं हेच तुमच्या हातात आहे. ते करा आणि बाकी फळाची अपेक्षा करू नका. कुठेतरी आपल्या कर्मांचा हिशोब मांडला जातो आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं.
हृदयविकाराचा झटका आल्यावर पत्नी दीप्ती आणि कुटुंबाने काय केलं?
हृदयविकाराचा झटका आल्यावर अनेक लोकं पथ्यपाणी, औषधं वैगरे सांगतात. पण सर्वप्रथम या घटनेतून सुखरुप आल्यावर मी देवाचे मनोमन आभार मानले. पुढे हॉस्पिटलमधून घरी आल्यावर माझ्या आईसाठी, सासू - सासरे आणि दीप्तीसाठी आम्ही एक पूजा केली. जे काय घडलं तो एक दैवी चमत्कार होता. कधीतरी तुम्ही एकदम ठणठणीत असता तेव्हा तुम्हाला काहीच होत नाही. पण कधीकधी धडधाकट असतानाही अशा गोष्टी घडतात ज्यावर तुमचा कंट्रोल नसतो. त्यामुळे मी देवाचे प्रचंड आभार मानले. याशिवाय चाहत्यांच्या प्रार्थना, शुभेच्छा, सदिच्छा इतक्या आहेत की, ते ऋण मी कधी फेडेन असं वाटत नाही.
'कर्तम् भुगतम्' मधील सहकलाकार विजय राजसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
विजय राज एकदम निवांत माणूस आहे. पण या स्वभावाचा आम्हा सहकलाकारांना फायदा होतो. याशिवाय ते खूप विनोदीही आहेत. म्हणजे फक्त बसले जरी असतील तरी त्यांचा काही ना काही टाईमपास, मजा मस्ती, जोक चालू असतात. पण विजय राज कलाकार म्हणून इतका ताकदीचा आहे की, अॅक्शन म्हटल्यावर ते एकदम त्या भूमिकेत शिरतात. ट्रेलरमध्ये माझ्यापेक्षा विजय राज यांचे डायलॉग जास्त पाहायला मिळतील. कारण त्यांची डायलॉग डिलीव्हरी कमाल आहे. माझं काम कोणाला आवडत असेल तर त्यासाठी अशा सहकलाकारांचा मोठा वाटा आहे.