Sonu Sood on Loudspeaker Controversy : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून सध्या राजकारण ढवळून निघालं आहे. मशिदीवरील भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असं आवाहन राज यांनी केलं आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतंच सोनू सूदने शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी मीडियाशी बोलताना त्याने भोंग्यांच्या मुद्यावर मत मांडलं. ‘आपण सर्व जात-धर्म यातून बाहेर पडलो तरच देशाची प्रगती होऊ शकेल, असं मला वाटतं. देश एकसंघ राहणं महत्त्वाचं आहे. माझ्या मते, जी ताकद हनुमान चालिसामध्ये आहे, तीच ताकद नमाज किंवा अजानमध्ये आहे. दोन्हीही ऐकण्यासाठी तितक्याच चांगल्या वाटतात. धर्मात अडकून पडलात तर लोकांचे प्रश्न कधीही सुटणार नाहीत. देशात रोजगार किंवा इतरही अजून गंभीर समस्या आहेत,’असं तो म्हणाला.
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर गेल्या 1 मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादेत जाहीर सभा घेतली होती. यानंतर काल त्यांची पत्रपरिषदेत झाली. दिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते, त्यांची प्रार्थना म्हणतात ती जर परत त्यांनी दिली तर आमचे लोक त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार.
राज्यातील भोंग्यांचा मुद्दा हा सामाजिक आहे. धार्मिक नाही. सणासुदीच्या वेळी, सभेसाठी, एखाद्या काही कारणासाठी ठीक आहे. पण वर्षभरासाठी नाही. तुम्हाला कुणाला ऐकवायचे आहे. आम्हाला नाही ऐकायचे. या भोंग्यांमुळे, आजारी माणसांना महिलांना, लहाण मुलांना विद्यार्थ्यांना त्रस होतो. एवढेही समजत नाही, असे म्हणत, माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.