Sunny Deol Juhu Bungalow News: खासदार आणि अभिनेता सनी देओलचा गदर-२ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला आहे. देशभरात सनी देओलची चर्चा आहे. मात्र, यातच सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. जुहू येथील बंगल्याच्या लिलावाची प्रक्रिया बँक ऑफ बडोदाने सुरू केली असून या लिलावाच्या माध्यमातून बँक कर्ज आणि व्याजापोटी लागू असलेले ५६ कोटी रुपये वसूल करणार आहे. परंतु, आता या बंगल्याचा लिलाव होणार नाही. बँकेने नोटीस मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या बँक ऑफ बडोदोने अभिनेता सनी देओल याला २०१६ मध्ये सिनेमा निर्मितीसाठी कर्ज दिले होते. या कर्जाकरिता त्याचा भाऊ व अभिनेता बॉबी देओल आणि त्याचे वडील व सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि सनीची कंपनी सनी साउंड्स प्रा.लि. अशी तिघांनी या कर्जासाठी हमी दिली होती. तसेच, या कर्जासाठी सनी देओल याने जुहू येथील गांधीग्राम रोडवर असलेली सनी व्हिला हा आलिशान बंगला तारण म्हणून ठेवला होता. सनी याने कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने अनेक वेळा त्याला नोटिसा जारी केल्या होत्या. त्या नोटिसींना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. डिसेंबर २०२२ मध्ये हे कर्ज खाते थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, आता बँकेने नोटीस मागे घेतल्याचे सांगितले जात असून, बंगल्याचा लिलाव होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
बँक ऑफ बडोदाने ई-लिलावाची नोटीस मागे घेतली
बँक ऑफ बडोदाने ई-लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. याचे कारण तांत्रिक असल्याचे सांगण्यात आले आहे. सनी देओलच्या टीमने रविवारी लिलावाच्या नोटिसीच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम योग्य नसल्याचे त्यांच्या बाजूने सांगण्यात आले. तसेच सनी देओल एक-दोन दिवसांत संपूर्ण रक्कम देईल, असेही सांगण्यात आले आहे. जुहूमधील आलिशान ठिकाणी हा बंगला असून या बंगल्यामध्ये आणखी दोन निर्मात्यांची कार्यालये आहेत. सनीचे कार्यालय आहे. तसेच, एक आलिशान साउंड स्टुडिओ आणि छोटेखानी चित्रपट थिएटर आहे.
दरम्यान, सनीच्या प्रकरणात बँकेने ५१ कोटी ४३ लाख ही राखीव किंमत निश्चित केली असून लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्ती वा कंपनीस ५ कोटी १४ लाख रुपये अमानत रक्कम म्हणून भरावी लागणार होती. तसेच, लिलावाची सुरुवात ही राखीव किमतीपेक्षा १० लाख रुपये अधिक रकमेने सुरू होणार होती. येत्या २५ सप्टेंबर रोजी ई-ऑक्शन पद्धतीने या मालमत्तेचा लिलाव होणार होता. लिलावात इच्छुक असलेल्या लोकांना २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार होता.