एखाद्या कलाकारासाठी फिल्मफेअर पुरस्कार हे स्वप्न असते. त्यात पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यावर तर वेगळीच उर्जा मिळते. मराठी फिल्मफेअर पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. त्यात अभिनेता विराट मडकेला फिल्मफेअरचा पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. केसरी –Saffron या सिनेमासाठी विराटला फिल्मफेअर २०२१चा पदार्पणाचा पुरस्कार मिळाला.
विराट आपल्या या पहिल्या पुरस्काराबद्दल सांगतो, ''मला खरंतर सुरुवातीला विश्वासच बसला नाही, स्वप्नातही मी विचार केला नव्हता, हा असा दिवस असेल. पहिल्या सिनेमासाठी मिळालेली ही शाबासकीची थाप खूपच मोलाची आहे. मेहनतीचं चीज झालं असं वाटत आहे. दोन ती वर्षे केसरी साठी मेहनत केली होती. त्यानंतर दोन वर्ष कोरोनामुळे कठिण काळ होता. पुढे काही चांगलं होईल का असंच वाटत होतं. पण, एका बाजूला सिनेमाचं शूटिंग सुरु झालं आहे. तसंच आता फिल्मफेअर सारखा पुरस्कार मिळाला त्याने खूपच आनंद झाला आहे.'' सुजय डहाके दिग्दर्शीत केसरी –Saffron या सिनेमात.
विराट कुस्तीविराच्या भूमिकेत दिसून आला होता. विराटने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली होती. पैलवानाच्या शरीरयष्टीसाठी अत्यंत मेहनतीने, व्यायाम आणि आहाराच्या बळावर शरीर कमावले होते. सिनेमा रिलीज झाला तेव्हा विराटचे कौतुक झाले होते. आता पुरस्कार रुपाने त्याच्या कामावर शिक्कामोर्तब झाले आहे.