झी चित्र गौरव पुरस्कारानंतर आता झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्याची चर्चा आहे. या पुरस्कार सोहळ्यात वर्षभरातील लोकप्रियता मिळालेल्या आणि गाजलेल्या नाटकांचा आणि कलाकारांचा गौरव केला जातो. झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या सोहळ्यात दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना मानवंदना देण्यात येणार आहे. याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत अतुल परचुरेंसाठी स्वर्गाचं दार उघडण्यात आल्याचं दिसत आहे. "झालास का रे सेटल इथे?" असं विचारताच अतुल परचुरे म्हणतात, "नाही अजून". "अजूनही सोनियाची, घरच्यांची, मित्रांची खूप आठवण येते. कधी कधी खाली जाऊन विचारावंसं वाटतं...मोन्या, कसा आहेस रे? तुझी खूप आठवण येते यार...त्या अंड्याला सांगा कुणीतरी की म्हणावं आता तरी स्वत:चे किस्से सांग. बरं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळे जमता ना पार्क क्लबमध्ये? तिथे असतो मी...तुमच्या गप्पा ऐकतो. भेटत राहा. आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात", असं ते म्हणतात. हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आल्याचं दिसत आहे.
अभिनेते अतुल परचुरे यांचं गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला निधन झालं. ते कॅन्सरशी लढा देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या अकाली एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीच भरुन निघणार नाही.