महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. इतकेच नाही तर या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू या पात्रांसोबतच बाबा चमत्कार हे पात्र देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यानंतर झपाटलेला २ प्रदर्शित झाला. या चित्रपटालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांमध्ये आपल्याला बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा पाहायला मिळाली होती. ही भूमिका राघवेंद्र कडकोळ यांनी साकारली होती. सध्या राघवेंद्र कडकोळ हलाखीच्या परिस्थितीत असून ते पत्नीसोबत पुण्यातील वृद्धाश्रमात राहत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत राघवेंद्र कडकोळ काम करत आहेत. त्यांनी अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते यांसारख्या अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. झपाटलेला चित्रपटावेळी राघवेंद्र यांचे वय 50 होते तर झपाटलेला 2 वेळी ते 70 वर्षांंचे होते. दोन्ही चित्रपटांतील त्यांनी वठवलेली बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. पण या अभिनेत्यावर आज हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करण्याची वेळ आली आहे. प्रसिद्धी मिळाली मात्र पैसे कमावता आला नाही याची खंत त्यांना लागून आहे. राघवेंद्र आता त्यांच्या पत्नी लतिका कडकोळ यांच्यासोबत पुण्यातील बावधन येथील पालाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर येथे राहत आहेत. इतका मोठा आणि दांडगा अभिनय जो आजही सर्वांच्या लक्ष्यात असूनही कोणी काम देत नाही म्हणून कोणाकडे कामासाठी हात पसरायचे नाहीत असे त्यांनी ठरवल्याचे समजते आहे.
ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून राघवेंद्र कडकोळ यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यामागे देखील एक कथा आहे. त्यांना नौदलात भरती व्हायचे होते. आणि त्यासाठी त्यांनी परीक्षा देखील दिली होती. परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना जहाजावर पाठवण्यात आले. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांची पुन्हा मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यात त्यांच्या कानात दोष असल्याचे कारण देत त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. त्यांच्यासाठी हा खूपच मोठा धक्का होता.पण खचून न जाता त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला नाटकांमध्ये खूपच छोट्या भूमिका साकारल्या.
करायला गेलो एक या नाटकाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनयकारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. ते नाटक सांभाळून नोकरी करत होते. पण नाटकांच्या दौऱ्यामुळे सतत सुट्ट्या घ्याव्या लागत असल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांनी नाट्य आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली.