ज्येष्ठ अभिनेत्री राखी गेल्या अनेक वर्षांत कोणत्याच चित्रपटात झळकल्या नाहीत. त्या सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर असून शेती करण्यात रमल्या आहेत. अभिनेत्री राखी यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत.
राखी यांच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. राखी यांना शिक्षण घ्यायचे होते. त्यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते. कमी वयातच त्यांना बांगला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 20 व्या वर्षी राखी यांनी बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले. 'जीवन मृत्यू' हा राखी यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर अनेक ऑफर्स आल्या होत्या. ‘शर्मिली’, ‘लाल पत्थर’, ‘आँचल’, ‘कसमे वादे’, ‘कभी कभी’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
चित्रपट विश्वात राखी यांना जितके यश मिळाले तितक्याच त्या खासगी आयुष्यात अपयशी ठरल्या. गीतकार गुलजार यांच्याशी लग्न बेडीत अडकल्यानंतर राखी यांनी चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर मात्र त्यांच्या नात्याला तडा गेला आणि गुलजार- राखी वेगळे झाले. नात्यांमध्ये आलेल्या या वादळाने त्यांच्या आयुष्यावर बराच परिणाम केला. राखी आणि गुलजार यांनी घटस्फोट घेतला नसून, ते फक्त वेगळे झाले आहेत असे सांगितले जाते.
अभिनेत्री राखी यांनी गेल्या काही वर्षांत चित्रपटात काम करणे बंद केले असून त्यांनी मुंबई जवळ असलेल्या पनवेलमध्ये एक फार्म हाऊस घेतले आहे. तिथे त्या शेती करतात. तसेच त्यांनी गाय, घोडे, कुत्रा आणि अनेक प्राणी पाळले आहेत.