'ऐश्वर्या नारकर' (Aishwarya Narkar) बस नाम ही काफी है! त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तसंच त्यांच्या अभिनयाला तर तोडच नाही. 'या सुखांनो या', 'स्वामिनी' ते आता 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. करिअरमध्ये यश मिळत असतानाच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न, संसार, मूल आणि करिअर हे सगळं कसं सांभाळलं याविषयी त्यांच्याशी 'लोकमत फिल्मी'ने संवाद साधला.
>>ऋचा वझे
१. जवळपास ३० वर्षांपासून तुम्ही इंडस्ट्रीत काम करत आहात. यामध्ये घर, संसार आणि करिअर एकत्र कसं सांभाळलंत?
मी त्याबाबतीत खूप नशिबववान आहे. मला कोणताच अडसर नव्हता. माहेर आणि सासरकडून खूप पाठिंबा होता. आमचं एकत्र कुटुंब असल्याने खूप मदत झाली. स्त्री म्हणून आपल्यात घर आणि संसार सांभाळणं हे आपसूक येतंच. आपणही आपली जबाबदारी पार पाडतच असतो. हे सगळं बायकांमधलंच म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. तसंच पुरुषांमध्येही एकप्रकारची फेमिनाईन एनर्जी असते. ती त्यांनी वापरली पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांचं समान योगदान असेल तर सगळं व्यवस्थित पार पडतं.
२. तुम्ही आधीही अनेक मालिकांमध्ये काम केलं. आताही तुमची मालिका खूप गाजत आहे. तुमच्या सुरुवातीच्या काळात आणि आताच्या कामात किती फरक जाणवतो?
तेव्हा सह्याद्री,अल्फा हे चॅनल होते. तिथे काम करत असताना आपले कपडे आपल्याला घेऊन फिरायला लागायचं. आतासारखे कॉस्च्युअम डिझायनर नसायचे. कपडे आपले असायचे, आपणच तयार होऊन जायचं. प्रोफेशनलिझम खूप कमी होतं. घरगुती प्रकार असायचा. आता सगळ्या सोयी सुविधा आहेत. कॉस्च्युअम, मेकअप सगळं प्रोडक्शनकडून मिळतं. सगळं अपग्रेड झालं आहे. तेव्हा सांताक्रृज ते मढ रिक्षाने जायचो. मग वाटायचं किती खर्च होतोय. आता एवढा विचार येत नाही कारण प्रोडक्शनकडून खूप काही मिळतं.
३. तुमच्या उमेदीच्या काळात इतर अभिनेत्रींसोबत तुमची स्पर्धा असायची का?
मला कधी स्पर्धा जाणवली नाही. नशीबच एवढं होतं की मला पहिलाच महाश्वेता मालिकेत राधा हा महत्वाचा रोल मला मिळाला. माझं काही असं ध्येयही नव्हतं की मला मोठा रोल हवा, अमुक प्रोजेक्ट करायचे अशी माझी अपेक्षा नव्हती. जे मिळेल ते मी करायचे. त्यामुळे हिला हे प्रोजेक्ट मिळालं मग मला का नाही मिळालं हा विचार मी कधीच केला नाही. मी जे करतेय ते मला जमतंय, हेच करायचंय याच झोनमध्ये मी होते. मला अजूनही 'महाश्वेता' मधली राधा म्हणून ओळखलं जातं. या मालिकेला आता २६ वर्ष झाली. 'या सुखांनो या'ची सरिता असेल किंवा बेटिया मधली भूमिका सगळंच मला जवळचं वाटतं.
४. स्त्री म्हणून इंडस्ट्रीत काही आव्हानं आली का?
मी सुरुवात नाटकापासून केली . बालनाट्य करत होते. नंतर मी अगदीच चंद्रलेखा गंध निशिगंधा नावाचं पहिलं प्रोफेशनल नाटक केलं. त्याआधी मी अगदीच बालनाट्य करत होते. मग नंतर थेट या प्रोफेशनल नाटकात आले. त्यामुळे हे नाटकच माझ्यासाठी वर्कशॉप असल्यासारखं होतं. असे प्रयोग असतात, पैसे मिळतात, थिएटर्स कोणती आहेत, तिथे कसं जायचं हे , भूमिका कशी करायची हे सगळं मी अगदी बेसिक तिथून शिकले. प्रभाकर पणशीकर, शरद पोंक्षे, अविनाश नारकर या सगळ्यांकडून खूप शिकले. नंतर विक्रम गोखलेंबरोबर मी नाटक केलं. या दोन नाटकातून मी अभिनय शिकले. हे माझं लाईव्ह शिबीरच होतं. त्यामुळे मला आव्हानं नाही तर उलट मदतच खूप झाली.
५. आजकाल अनेक मुली करिअरला प्राधान्य देत लग्न, मूलबाळ हे निर्णय लांबणीवर टाकतात. तुम्हाला याविषयी काय वाटतं?
आपण आपल्या प्रायोरिटी ठरवल्या पाहिजे. मला वैयक्तिकरित्या वाटतं की लग्न, मूल याला प्राधान्य दिलं पाहिजे. या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे. करिअर हे सुरु राहतं. बाळाच्या जन्मानंतरही करिअर करु शकतो. जेव्हा बाळ मोठं होईल तेव्हा आपणही कार्यरत असणं गरजेचं आहे. आपल्या म्हातारपणात जर त्याची विशी आली तर आपण त्याच्या करिअरला कसा सपोर्ट करणार. त्याच्यावरही दबाव येऊ शकतो. तसंच बाळ वेळेत झालं तर तुम्हाला शारिरीकरित्याही त्रास होत नाही. तुम्ही उलट आणखी फिट होत जाता. करिअरमुळे लग्न नको, मुलं नको असं काही नसतं. तुम्ही ते महिने, एखादं वर्ष दिलंत तर मॅनेज होऊ शकतं. करिअर संसार याची सांगड घातली तर सगळं सोपं होऊ शकतं. नवीन पिढीचे टेन्शन समजू शकते पण मार्ग निघतात. सुवर्णमध्य काढता येतो.
६. एखाद्या चाहत्याने किंवा चाहतीने दिलेली लक्षात राहण्यासारखी प्रतिक्रिया कोणती?
या सुखांनो या वेळी मी एका चाहतीला भेटले. मालिका पाहून त्या मला सतत फोन करायच्या की आमच्या घरातही असंच झालं, हेच सुरु आहे. मग मीही त्यांना समजावून सांगायचे. हे माझं चाहतीबरोबर वैयक्तिक नातं तयार झालं होतं. त्यांनाही आपली भूमिका इतकी पर्सनल वाटते आपलं कॅरेक्टर त्यांच्यापर्यंत पोहोचतं हे पाहून छान वाटतं. नंतर अचानक मला त्यांचा फोन येणं बंद झालं. दोन तीन महिन्यांनी मला त्यांच्या नातेवाईकाने सांगितलं की त्या तुमची खूप आठवण काढायच्या. त्यांचं निधन झालं. ते ऐकून मला खूप धक्का बसला की ज्यांना मी एकदाच भेटले पण नंतर माझं त्यांच्याशी इतकं फोनवर बोलणं असायचं अगदी जवळची मैत्रीण समजत होत्या त्या अशा अचानक गेल्या. मग वाटलं बापरे आपण काय देणं लागतो, काय ते बाँडिंग असतं याचा प्रत्यय आला. बऱ्याचदा भूमिकांचा दुसऱ्यांवर आणि आमच्यावरही परिणाम होत असतो.
७. योग करण्याची सवय कशी लागली? तसंच तुम्ही रेकी प्रॅक्टिशनर त्याबद्दल काय सांगाल?
व्यायाम हा प्रकार १२ ते १३ वर्षांपासून माझ्यासोबत आहेच. कोणत्याही प्रकारचा व्यायाम असला पाहिजे. तुम्ही फीट असाल तर सगळ्याच गोष्टीत आनंद वाटतो. आपण स्वत:वर प्रेम करणं, आपल्याला आवडेल असं राहणं हे आनंदी आयुष्याचं गुपित आहे. मी सध्या योग शिकत आहे. रेकीबद्दल सांगायचं तर मी रेकी द्यायला शिकले. त्यात मी मास्टर केलंय. माहितीच्या लोकांना मी ट्रीट करते. हे मी प्रोफेशनल म्हणून नाही तर मोफत करते.
८. प्राण्यांवर तुमचं विशेष प्रेम आहे. सध्या प्राण्यांवर होणारे अत्याचार पाहून वाईट वाटतं. यावर काय सांगाल
प्राण्यांबरोबर आपण सहजीवनात राहिलं पाहिजे. वाटेल तसं त्यांना वागवता कामा नये. या निसर्गात त्यांचं योगदान आपल्यापेक्षाही अधिक आहे. माणूस काही योगदान देत नाही. प्राणी, पक्षी हा प्रत्येक जीव काहीतरी योगदान देत असतो. त्याचसाठी त्यांची योजना झालेली असते. त्यांना प्रेमाने नाही वागवता आलं नाही तरी त्यांना त्रास होईल असं वागू नये. त्यांना खायला प्यायला घालायला पाहिजे. कारण आपणच त्यांच्या हॅबिटॅट मध्ये घुसून त्यांचे खायचे प्यायचे स्त्रोत बंद केले आहेत. आपलं कर्तव्य आहे की पावसाचं त्यांना सुरक्षा दिलं पाहिजे, न्यूट्रिंग केलं पाहिजे.
९. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला तुम्ही अनेकदा उत्तर देता. हे तुम्ही गांभीर्याने घेता का?
मी गांभीर्याने घेते. मी रील्स करते मला आनंद मिळतो. सोशल मीडियाचा उद्देश आनंद देणं घेणं हा असला पाहिजे. दुसऱ्यांना वाटेल तसं बोलण्यासाठी तुम्ही नाही आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात बघा. नसेल आवडत तर बघू नका हा मार्गही आहे. दुसऱ्याचं आयुष्य नामोहरम करण्याचा अधिकार तुम्हाला नाही.समोरच्याला त्रास होणार नाही हा प्रयत्न करा. सोशल मीडिया निखळ करमणूकीसाठी आहे त्याचा तसाच वापर करा.
१०. नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर होतो. तुमची देवावर किती श्रद्धा आहे. महिला अत्याचारांचं प्रमाण वाढतंय त्याबद्दल काय वाटतं.
माझी देवावर श्रद्धा आहे. पण मला वाटतं उपास तापास करुन त्रास होणार असेल तर करु नका. देवांना बळी देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. हेही मला पटत नाही. कोणाचा जीव घेणं किती योग्य आहे याचा विचार करा. या प्रथा सुरु झाल्या तेव्हाची सामाजिक परिस्थिती काय होती हे बघा. आता आपण वैचारिक, सामाजिकदृष्ट्या किती पुढे आलोय. प्राण्याचा जीव घेणं किती योग्य आहे हे विचार करा. नरबळी प्रथा चालू राहिली असती तर चाललं असतं का? आता आपण प्रगत झालोय तर ते कृतीतून दिसलं पाहिजे.
महिला अत्याचार घटना वाढत असल्या तरी आपण प्रतिकार केलेच पाहिजे. आपणच त्या वाढू देतोय. मुलांना संस्कारित केलं नाही तर ती पिढीही तशीट होईल. माणूस म्हणून समोरच्याचा मान ठेवला पाहिजे. नाहीतर हे होतंच राहणार.