Join us

अखेर अभिनेत्री ऐश्वर्या राणेंना मदत मिळणार, शिक्षण उपसंचालक कार्यालय आधार देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 6:40 AM

ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्यासोबत ‘धूमधडाका’ तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘भटक भवानी’ या चित्रपटात काम केले आहे.

मुंबई : ‘धूमधडाका’ या गाजलेल्या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री ऐश्वर्या राणे या कोणाला ओळखू येणार नाहीत, अशा अवस्थेत दिसल्या. त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. एका अपघातामुळे अपंग झालेल्या ऐश्वर्या आता मदतीसाठी मंत्रालय आणि संस्थांच्या कार्यालयांकडे फिरत आहेत. मंत्रालयानंतर आता त्या उपसंचालक विभागाकडे आल्या असून, मुंबई उपसंचालक कार्यालयाने त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी मुंबई पश्चिम, उत्तर, दक्षिण निरीक्षण कार्यालयांतून तसेच उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून शक्य तितका निधी गोळा करून त्यांना तो २० नोव्हेंबर रोजी सुपुर्द केला जाणार आहे.

ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्यासोबत ‘धूमधडाका’ तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘भटक भवानी’ या चित्रपटात काम केले आहे. त्यांचे प्रियतम्मा हे गाणे खूप गाजले. केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले. ‘मर्द’ सिनेमात अमृता सिंगच्या डमीचे काम करताना त्यांना घोड्याने फेकले. त्या वेळी त्यांना जास्त त्रास झाला नाही, पण सहा महिन्यांनंतर त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. त्या वेळी त्या दुबईत होत्या. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना इतकी महाग ट्रिटमेंट दिली की त्यांना ती झेपली नाही. त्या ट्रिटमेंटसाठी ऐश्वर्या यांनी घर, दागिने विकले. एफडीही मोडल्या. घरी काहीही न सांगता त्या दुबईला जाऊन ट्रिटमेंट घेत असत. काही दिवसांत त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या. यामुळे साहजिकच त्या अभिनयापासून दूर गेल्या. हा गॅप पडल्याने इंडस्ट्रीला त्यांचा विसर पडला. आता त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता भासत आहे.सिनेजगत आपल्याला विसरले असले तरी माझे प्रेक्षक मला विसरले नसून त्यांच्याकडून मदत मिळत असल्याचे ऐश्वर्या यांच्या आईने सांगितले. काही दिवसांपूर्वी मंत्रालयातून मदत मिळाल्यानंतर त्यांनी उपसंचालक कार्यालयाला भेट दिली. कलाकार म्हणून त्यांना पेन्शन मिळत असली तरी ती तुटपुंजी असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. एका कलाकारावर एवढी हलाखीची परिस्थिती आल्याने सामाजिक भान जपत जास्तीतजास्त आर्थिक मदत करण्याचे आवाहन उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी आपल्या कर्मचाºयांना केले आहे.

टॅग्स :मुंबईअशोक सराफ