मुंबई-
बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात मुरादाबादच्या एसीजेएम-५ च्या कोर्टानं वॉरंट जारी केलं आहे. कोर्टाच्या सुनावणीवेळी उपस्थित न राहिल्यानं अमिषाच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अमिषा पटेलला आता २० जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीला कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यावर ११ लाख रुपये घेऊनही कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी मुरादाबादच्या कोर्टात खटला दाखल आहे.
एका इव्हेंटसाठी ११ लाख रुपये अॅडव्हान्स घेऊनही उपस्थित न राहिल्याचा आरोपा अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यावर करण्यात आलेला आहे. एका लग्न समारंभात उपस्थित राहून डान्स करण्यासाठीची अमिषा पटेल हिला निमंत्रित करण्यात आलं होतं. यासाठी तिला आगाऊ रक्कम देखील देण्यात आली होती. असं असतानाही अमिषा इव्हेंटला उपस्थित राहिली नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या ड्रीम व्हिजन इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी अमिषा पटेल विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील कोर्टात यावर सुनावणी सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे आयपीएसी धारा १२०-बी, ४०६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत अमिषा पटेल विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अमिषा पटेल हिला अॅडव्हान्स पेमेंट तर केलंच होतं. पण तिचा मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवासाचा तसंच फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च देखील केला होता, असा दावा अमिषा पटेल विरोधात तक्रार करणाऱ्या इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी केला आहे.