ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. जया बच्चन यांनी अभिनेत्री म्हणून एक काळ गाजवला आहे. सध्या खासदार म्हणूनही त्या जनेतेचे प्रश्न संसदेत मांडत असतात. जया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जया बच्चन यांना उपसभापतींनी 'जया अमिताभ बच्चन' या नावाने पुकारल्यावर त्यांचा राग अनावर झाला. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. नेमकं काय घडलं?
संसदेत अमिताभ बच्चन यांचं नाव जोडताच जया बच्चन चिडल्या
सोमवारी राज्यसभेत दिल्लीतील कोचिंग क्लासमध्ये जी दुर्घटना घडली त्यावर चर्चा सुरु होती. यावेळी उपसभापती हरिवंश यांनी जया बच्चन यांना चर्चेत सहभागी होण्यासाठी त्यांचं नाव पुकारलं. जया अमिताभ बच्चन अशा पूर्ण नावाने त्यांना पुकारण्यात आलं. त्यावर जया या काहीश्या रागावलेल्या दिसल्या. त्या उपसभापतींना म्हणाल्या, "फक्त जया बच्चन बोललं असतं तरी पुरेसं होतं."
जया यांनी उपसभापतींना दिलं उत्तर
जया अमिताभ बच्चन हे पूर्ण नाव ऐकताच उपसभापतींना उत्तर देत त्या म्हणाल्या, "हा सध्या जो नवीन ट्रेंड आलाय त्यानुसार महिलांची ओळख त्यांच्या पतीच्या नावाने होतेय. म्हणजे आम्हाला काहीच अस्तित्व नाही." हे ऐकताच उपसभापतींनीही खेळकरपणे हा विषय हाताळला. पुढे जया बच्चना यांनी दिल्ली कोचिंग दुर्घटनेबद्दल उत्कट भाषण केलंय. दुर्घटनाग्रस्त विद्यार्थ्यांची बाजू मांडताना त्या भावुक झालेल्या दिसल्या.