मुंबई : महाराष्ट्र मूल्यवर्धित सेवा कराअंतर्गत विक्रीकर विभागाने बजावलेल्या दोन नोटिशींना बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अनुष्काच्या याचिकेवर तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश विक्रीकर विभागाला देत पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी ठेवली.
विक्रीकर विभागाने बजावलेल्या दोन्ही नोटीस रद्द कराव्यात, अशी मागणी अनुष्काने याचिकेद्वारे केली आहे. तिच्या याचिकेवरील सुनावणी न्या. नितीन जामदार व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर होती. अनुष्काचे कर सल्लागार श्रीकांत वेळेकर यांनी अनुष्कातर्फे विक्रीकर विभागाच्या नोटिशींना आव्हान दिले होते. मात्र, गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने वेळेकर यांची याचिका दाखल करून घेण्यास नकार दिल्याने अनुष्काला स्वत: याचिका दाखल करावी लागली.
याचिकेत काय?
- यशराज फिल्म्स प्रा.लि. कार्यक्रम आयोजकांबरोबर तिच्या एजंटद्वारे केलेल्या त्रिपक्षीय करारानुसार चित्रपटांत व तत्संबंधी कार्यक्रमांत कलाकार म्हणून काम केले.
- विक्रीकर विभागाने अनुष्काला २०१२-१३ या आर्थिक वर्षासाठी १२.३ कोटी आणि या रकमेवरील व्याज म्हणून १.२ कोटी रक्कम भरण्यास सांगितले. तर २०१३-१४ १७ कोटी रुपयांवर १.६ कोटी रुपये व्याज भरण्यास सांगितले.
- चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला चित्रपटाची निर्माती म्हणता येणार नाही, असा अनुष्काचा दावा आहे.