अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) हिची बहीण मधुचा मार्कंडेयचा दोन आठवड्यापूर्वीच संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा होत्या असं शवविच्छेदन अहवालात उघड झालं होतं. यानंतर अद्याप तपासात काहीच उघड न झाल्याने भाग्यश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने एका व्यक्तीचा उल्लेखही केला आहे.
मधू मार्कंडेय भाग्यश्रीची सख्खी मोठी बहीण होती. बहिणीच्या निधनाने भाग्यश्री पुरती कोसळून गेली आहे. तसंच संशयास्पद मृत्यू असल्याने अजुनपर्यंत तपास कसा लागत नाही असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. भाग्यश्रीने सोशल मीडियावर लिहिले, 'हॅलो. हे कोणाला धमकावण्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी लिहित नाही. पण हे आमच्याकडून सत्य सांगत आहे. १२ मार्च रविवारी सुमारे ११ वाजता माझी बहीण केक वर्कशॉपसाठी निघाली होती. तिने सोबत केक बनवण्याचं सर्व साहित्य घेतलं होतं. तसेच तिच्यासोबत एक महिलाही होती. या महिलेशी तिची ओळख केवळ ३ ते ४ महिन्यांपूर्वी झाली असावी. आमच्या माहितीप्रमाणे, ती ५ महिलांसोबत वर्कशॉप घेणार होती. आता ती महिला सांगत आहे की त्यांना रस्त्यावर एक पॅम्पलेट मिळालं ज्यामध्ये भाड्याने रुम देण्याची जाहिरात होती. दोघीही त्यावर संपर्क करुन तिथे गेल्या. अर्धा तास त्या तिथे होत्या. अचानक माझी बहीण चक्कर येऊन पडली. त्यांनी तिला रुग्णालयात नेले. खाजगी रुग्णालयात तिला घेण्यात आले नाही कारण तिचे पल्स दाखवत नव्हते. यानंतर तिला वायसीएम(YCM) रुग्णालयात दाखल केले तिथे तिचा १ तासापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.'
भाग्यश्री पुढे लिहिते, 'माझी बहीण केक वर्कशॉपला गेल्याचा स्पष्ट पुरावा आहे. तिला एक दिवस आधी अॅडव्हान्सही मिळाला होता. तिच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या अशी डॉक्टरांची माहिती आहे. त्यामुळे जे घडलं ते संशयास्पद आहे. त्या दोघी ज्या ठिकाणी गेल्या ती जागा निर्मनुष्य होती. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. आर्थिक मदतीसाठी तिने हे वर्कशॉप तातडीने स्वीकारले होते. मला कळत नाही एवढं सगळं असताना तातडीने कारवाई का होत नाही. दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. सामान्य माणसाप्रमाणे मी सर्व प्रक्रिया केली पण मला उत्तरं मिळत नाहीत. माझ्या बहिणीला न्याय द्या.'
भाग्यश्रीच्या या पोस्टनंतर आता पोलिस काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं आहे. मधू मार्कंडेयच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले तरी अद्याप तपास लागलेला नाही. तिला दोन छोटी मुलं आहेत. सध्या भाग्यश्रीच त्यांचा सांभाळ करत आहे. तर मधू मार्कंडेयच्या पतीचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. त्यांची दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत.