70 व 80 च्या दशकात चित्रपट म्हटले की, नायिकेसोबत खलनायिका हमखास दिसायची. याच काळात एन्ट्री झाली ती अभिनेत्री बिंदूची. यानंतर फार कमी वेळात बिंदूने इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज बिंदूचा वाढदिवस. 17 एप्रिल 1941 साली गुजरातमध्ये बिंदूचा जन्म झाला होता. आज आम्ही बिंदूबद्दल सांगणार आहोत.
कधी नायिका, कधी खलनायिका तर कधी आयटम डान्सर अशा अनेक भूमिकेत पडद्यावर झळकलेल्या बिंदूने मॉडेलिंग करायला सुरुवात केली ती घरच्या परिस्थितीमुळे. सहा भावंडांमध्ये बिंदू सगळ्यात मोठी होती. पण ती 13 वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी बिंदूवर आली. पैसे मिळवण्यासाठी बिंदूने मॉडेलिंग सुरु केले आणि 1962 मध्ये तिला दिग्दर्शक मोहन कुमार यांच्या ‘अनपढ’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
पहिल्या चित्रपटानंतर बिंदूला काम मिळेना. याचदरम्यान घरामागे राहणा-या चंपकलाल जवेरीसोबत बिंदूची ओळख झाली. मग मैत्री आणि नंतर प्रेम. घरच्यांनी बिंदूला अक्षरश: नजरकैदेत ठेवले. पण बिंदूचे प्रेम कमी होण्याऐवजी आणखी बहरले. बिंदू व चंपक यांनी सगळ्यांचा विरोध झुगारून लग्न केले. पण सासरच्यांनीही बिंदू व चंपक यांना घरातून हाकलून लावले. वडिलोपार्जित संपत्तीतूनही बेदखल केले. लग्नानंतर वर्षभरानंतर बिंदूने राजेश खन्ना यांच्यासोबत ‘दो रास्ते’ साईन केला. मात्र का कसे कुणास ठाऊक, पण या चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाच बिंदूकडे चित्रपटांची रांग लागली. इत्तेफाक, डोली, आया सावन झूम केले असे चित्रपट तिच्या हातात होते.
सुरूवातीला बिंदूने हिरोईन बनण्याचा प्रयत्न केला. पण कधी उंच आहे, कधी हिंदी बोलता येत नाही या व अशा कारणाने हिरोईन म्हणून त्यांना नाकारण्यात आल्या. तिला मिळाल्या त्या प्रामुख्याने खलनायिकेच्याच भूमिका. पण या भूमिकाही बिंदूने जीव ओतून वठवल्या आणि एक वेगळी ओळख निर्माण केली.
आज बिंदू चित्रपटात सक्रीय नाहीत. पण अलिशान आयुष्य जगतात, आश्चर्य वाटेल पण आज बिंदू व चंपक हे दांम्पत्य अब्जावधीच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांचा हॉर्स ब्रीडिंग आणि रेसिंगचा मुख्य व्यवसाय आहे.
चंपकलाल जवेरी आणि बिंदू जवेरी यांच्या नावे मुबंईत जवेरी हॉर्स स्टँड फार्म आहे. पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, कोलकत्ता, म्हैसूर, उटी याठिकाणी घोड्यांच्या शर्यतीत त्यांचे घोडे धावतात. याशिवाय झुबा कॉपोर्रेशन, झुबा इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट, अॅग्रीकल्चर फार्म, अॅग्रीकल्चर प्रॉडक्ट्स, मिल्क प्रोड्युस अँड डेअरी प्रॉडक्ट फर्म्स असे अनेक बिजनेस हे करतात. पण त्यांचा प्रमुख धंदा हॉर्स ब्रीडिंग आणि रेसिंग हाच आहे.
घोड्यांच्या शर्यतीत आणि डर्बीच्या वेळी बिंदू आणि चंपक जवेरी हमखास दिसतात. पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये त्यांचे आलिशान घर आहे. होय, अगदी शाहरुखच्या मन्नतपेक्षाही हे खूप मोठे आणि आलिशान आहे. बिंदू यांनी 2000 मध्ये चित्रपटांना रामराम ठोकला. पण आजही त्या अलिशान आयुष्य जगतात.