Madhura Velankar: मधुरा वेलणकर (Madhura Velankar) ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे. तिचा चाहतावर्ग सुद्धा प्रचंड मोठा आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मराठी सिनेइंडस्ट्रीतील गटबाजीवर भाष्य केलं आहे.
नुकतीच मधुरा वेलणकरने 'एनपी क्रिएशन्स'च्या 'गप्पा-टप्पा' या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्रीला अभिनय क्षेत्रात आऊटसाइडर असतात त्यांची अनेकदा फसवणूक केली जाते, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना मधुरा वेलणकर म्हणाली, "मी असं म्हणेन की मला या क्षेत्रातला अनुभव असून या क्षेत्रातले आई-बाबा असून फसवणूक माझ्यासोबतही झाली आहे. अगदी ज्यांना काका-मावशी म्हणून लहानपणापासून पाहिलं आहे ती माणसं सुद्धा वाईट वागली आहेत. त्यामुळे असं काही नसतं."
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "आता तर आपल्या मराठीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गटबाजी व्हायला लागली आहे. आपल्या लोकांबरोबर काम करायचं, आपल्याच लोकांचं कौतुक करायचं. आता यांनी केलं म्हणजे छान असणार मग त्याने वाईट केलं तरी त्याला छान म्हणायचं. अशा गोष्टी आता आपल्या आजुबाजूला व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे असं काही राहिलं नाही. म्हणजे माझ्या घरात मोठे कलाकार असल्यामुळे मला फेव्हरिटीझम मिळतो, असं मी अजिबात म्हणणार नाही. उलट बाहेरून आलेल्या लोकांशी काही वेळेला लढावं देखील लागतं. कारण ते आपल्याच ग्रुपमध्ये काम करतात. टॅलेंटनुसार खरंच कोण महत्वाचं आहे, याच्याकडे हल्ली दुर्दैवाने फार कमी लक्ष दिलं जातं. त्यामुळे मी असं म्हणणार नाही. फसवणूक अगदी आमचीसुद्धा झाली आहे. शिवाय बाहेरच्या लोकांनी येऊन आमची फसवणूक केली आहे. बाहेरुन आले म्हणजे ते सगळे साधे-भोळे असतात असं काही नसतं."