स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. प्रेक्षकांची लाडकी अरुंधती पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत सध्या स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे.
अरुंधती पुन्हा दिसणार
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेच्या सेटवरील मधुराणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत मधुराणी मालिकेतील आईसोबत अर्थात निवेदिता सराफ यांच्यासोबत गप्पा मारताना दिसते. सध्या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम बघायला मिळतेय. त्यानिमित्ताने स्टार प्रवाह आणि 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेच्या टीमने चांगलीच कल्पना लढवली असून मधुराणीला अरुंधतीच्या भूमिकेत परत आणलंय.
मधुराणी काय म्हणाली?
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या खास एण्ट्री बद्दल सांगताना म्हणाल्या, ‘पुन्हा एकदा अरुंधती साकारायला मिळतेय याचा अतिशय आनंद होतोय. साधारण दीड महिन्यापूर्वी आमच्या मालिकेने निरोप घेतला. प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल अरुंधतीला खूप मिस करत होते. सेटवरची लगबग, हातातली स्क्रिप्ट, कॅमेरा या सगळ्या गोष्टी खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळत आहेत. आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाच्या निमित्ताने अरुंधती खास हजेरी लावणार आहे. नव्या टीमसोबत काम करताना खूप छान वाटतंय." 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिका दुपारी २.३० वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.