९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री आज अलिप्त झाली आहे. बऱ्याच वर्षांनी आता ती छोट्या छोट्या भूमिकांमधून पुन्हा स्क्रीनवर आली आहे. एकेकाळी या अभिनेत्रीला ज्या दिग्दर्शकाने लाँच केलं त्याच्यावरच नंतर तिने आरोप लावले. त्या दिग्दर्शकासोबत तिने मोठा हिट सिनेमा दिला आहे ज्याची आजही सुपरहिट सिनेमांमध्ये गणना होते. कोण आहे ती अभिनेत्री वाचा.
१९९७ साली आलेला 'परदेस' आठवतोय? सुभाष घई (Subhash Ghai) दिग्दर्शित हा सिनेमा सुपरहिट होता. शाहरुख खान, अमरीश पुरीसारखे दिग्गज या सिनेमात होते. सिनेमातील मुख्य अभिनेत्रीने तिच्या गोड दिसण्याने, अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती अभिनेत्री आहे महिमा चौधरी (Mahima Chaudhry). याच सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सुभाष घईंनी तिला हा मोठा ब्रेक दिला होता. मात्र नंतर महिमा आणि सुभाष घई यांच्यात वाद झाला. महिमाने त्यांच्यावर अनेक आरोपही लावले.
काही वर्षांपूर्वी महिमाने मुलाखतीत सांगितले होते की, "मला सुभाष घईंनी खूप त्रास दिला होता. त्यांच्यामुळे मला कोर्टापर्यंतही यावं लागलं. त्यावेळी मी माझा पहिला शो रद्द करावा असं त्यांना वाटत होतं. माझ्यासाठी ते सगळंच खूप तणावपूर्ण होतं. त्यांनी सर्व निर्मात्यांना माझ्यासोबत काम न करण्याचा निरोप पाठवला होता. तुम्ही १९९८-९९ चे ट्रेड गाईड मॅगजीन पाहिले तर त्यात त्यांनी जाहिरात दिली होती की 'जर कोणाला महिमासोबत काम करायचं असेल तर आधी मला संपर्क करावा लागेल. नाहीतर ते कराराचं उल्लंघन होईल'. खरं पाहायला गेलं तर आमच्यात असा कोणताच करार झाला नव्हता ज्यात मला त्यांची परवानगी घ्यावी लागेल."
ती पुढे म्हणाली की, "माझी सत्या सिनेमासाठीही निवड झाली होती. मला साइनिंग अमाऊंटही मिळाली होती. पण मला काही न कळवता दुसऱ्याच अभिनेत्रीला सिनेमात घेतलं गेलं. राम गोपाल वर्मांनी माझ्याशिवायच शूटिंग सुरु केलं हे मला मीडियातून कळलं. मी खूप उदास झाले होते कारण सत्या माझ्या करिअरमधला दुसरा सिनेमा असला असता."