मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड (Nishigandha wad). आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं. त्यामुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. काळाच्या ओघामध्ये त्यांनी सिनेसृष्टीपासून थोडी फारकत घेतली आहे. मात्र, त्यांच्याविषयीच्या रंगणाऱ्या चर्चा अजूनही कायम आहेत. यात अलिकडेच त्यांच्या बालपणीचा एक किस्सा चर्चिला जात आहे. निशिगंधा वाड यांनी एकेकाळी चक्क हिऱ्याचे कानातले एका भंगारवाल्याला दिले होते.
अलिकडेच निशिगंधा वाड यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लहानपणीचा किस्सा शेअर केला. "मी लहान असताना एक आजोबा भंगार विकत असल्याचं मी पाहिलं. त्यांची ही अवस्था पाहून मला वाईट वाटलं. त्यामुळे घरात कोणालाही न सांगता मी कपाटातील हिऱ्याचे कानातले त्या आजोबांना दिले. पण, घरातून कानातले गायब झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर घरात शोधाशोध सुरु झाली", असं निशिगंधा वाड यांनी सांगितलं
पुढे त्या म्हणतात, "घरात शोधाशोध सुरु असताना मी शाळेतून घरी आले. त्यावेळी आई रडकुंडीला आली होती. तिने कानातले कुठे पाहिलेस का असं विचारलं. त्यानंतर मी घडलेला प्रकार सांगितला. ते भांगारवाले आजोबा आईलादेखील माहित होते त्यामुळे पुढील ३-४ दिवस आईने त्यांची रोज वाट पाहिली. आणि, एक दिवस ते आजोबा स्वत: आमच्या घरी आले आणि त्यांनी ते हिऱ्याचे कानातले परत केले. तसंच तुमच्या मुलीने हे कानातले दिले. पण, मी आजारी होतो त्यामुळे येऊ शकलो नाही. मी वारकरी माणूस आहे, जे हे कानातले परत केले नसते. तर, देवाला तोंड दाखवू शकलो नसतो", असं ते म्हणाले.
दरम्यान, ते आजोबा गेल्यानंतर आईने निशिगंधा वाट यांना एक सल्ला दिला. दानधर्म करावं पण ते आपण कमावलेल्या स्वत:च्या कमाईतून. हे दागिने मला माझ्या आईने दिले होते. तू जेव्हा मोठी होशील तेव्हा स्वत:च्या कमाईतून इतरांना मदत कर, असं आईने सांगितलं. निशिगंधा वाड यांनी अभिनेता दीपक देऊळकर यांच्यासोबत लग्न केलं असून त्यांनी दोन मुलीदेखील आहेत. तसंच निशिगंधा वाड या चारचौघी या मासिकाच्या संपादकदेखील आहे.