पॅलेस्टाईन आणि इस्त्राइलमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. त्यामुळे नुसरतचे चाहते खूपच चिंतेत पडले होते. आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुसरत सुखरुप भारतात परतली. नुसरत दुबई मार्गाने मुंबई विमानतळावर दाखल झाली आहे.
नुसरत हाइफा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेली होती. पण, युद्ध सुरु झाल्याने नुसरत तिथेच अडकली. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तिच्यासोबत शेवटचा संपर्क झाला होता. त्याठिकाणी ती एका बेसमेंटमध्ये असून सुरक्षित असल्याचे कळाले होते. त्यानंतरतिच्यासोबत संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळे तिचे कुटुंबीय आणि चाहते देखील अस्वस्थ झाले होते. आज दुतवासाच्या मदतीने नुसरत दुबईमार्गे इस्रायलमधून भारतात आली आहे.
नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्यार का पंचनामा, ड्रीम गर्ल, जनहित में यारी, राम सेतू सारख्या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकतेच नुसरत अकेली चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट युद्धाच्या वातावरणात अडकलेल्या मुलीच्या घरी परतण्याच्या संघर्षावर आधारित आहे. नुसरत इस्त्राइलमध्ये अडकल्याने चित्रपटातील घटना तिच्या आयुष्यात घडली असल्याचं बोललं जातंय.