'मोहरा' मध्ये 'ना कजरे की धार' गाण्यात दिसलेली अभिनेत्री पूनम झावर (Poonam Jhawer) आठवतेय का? पूनम झावरने नंतर अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तिने कधीच मुख्य भूमिका साकारल्या नाही मात्र तरी तिने स्वत:ची वेगळी ओळख मिळवली. पूनमने नुकतंच एका मुलाखतीत केलेलं एक वक्तव्य व्हायरल होतंय. सोनाक्षीसमोर मला बाई बनवलं असा आरोपही तिने केला आहे. 'आर राजकुमार' (R Rajkumar) सिनेमात ती दिसली होती.
'आर राजकुमार' सिनेमात शाहीद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये पूनम झावरचीही भूमिका होती. पण हा सिनेमा ती तिच्या लिस्टमध्ये धरत नाही. एका मुलाखतीत पूनम म्हणाली, "सिनेमात माझा रोल पूर्ण कट केला गेला. सेटवरील इतर लोकांनाही जाणवलं की माझ्यासोबत काहीतरी चूकीचं घडत आहे. जर अन्याय होत असेल तर मी बोलायला घाबरत नाही. स्क्रीप्टमध्ये जी भूमिका होती ती न देता मला सोनाक्षीसमोर बाई बनवलं. मॅडम आपके साथ सही नही हो रहा असं लोक मला बोलत होते. मी जी साडी नेसून यायचे ती मला बदलायला लावायचे. त्याऐवजी मला कॉटनची साडी द्यायचे. जिचं व्यक्तिमत्व चांगलं आहे तिला तुम्ही कॉटनची साडी देत आहात."
ती पुढे म्हणाली, "असंच वागायचं होतं तर मला त्यांनी सिनेमात घ्यायची गरज नव्हती. मी ठरवलं आहे की कोणत्याही सिनेमात कुत्रं बनून काम करणार नाही. मला राजकारणात जायचंय, बिझनेसवुमन व्हायचंयय. आता मी माझ्या भूमिका लिहून घेत जाईन. नेपोटिझम, ग्रुपिझमला मी बळी पडणार नाही."
सोनाक्षीबद्दल ती म्हणाली, "सोनाक्षी चांगली अभिनेत्री आहे. दिसायला सुंदर आहे. पण जर दुसरी व्यक्तीही चांगली दिसत असेल तर दिसू दिलं पाहिजे. नाहीतर मग सरळ सांगा माझ्याशिवाय दुसरं कोणी चांगलं दिसणार नाही."