आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे कलाविश्वासह प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). नाटक, मालिका, सिनेमा आणि आता तर वेबसीरिज अशा सगळ्यात क्षेत्रात प्रियाचा मुक्तपणे वावर आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रियाचा चाहतावर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळतं. सहाजिकच जसजसा प्रियाचा चाहतावर्ग वाढत आहे तसतस तिचे चाहते तिच्याविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रिया गेल्या काही दिवसांपासून वेबसीरिजच्या जगात जास्त रमलेली दिसतेय. प्रियाने आपल्या करिअरची सुरुवात मालिकेतून केली होती. मात्र काहीवेळेनंतर तिने मालिकांमध्ये काम करणं बंद केलं. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियानं याबाबत खुलासा केला आहे.
महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियाला तू मालिकांमध्ये काम करणं बंद का केलंस असा प्रश्न विचारण्यात आला. याच उत्तर देताना प्रिया म्हणाली, 'आभाळमाया' आणि 'अधुरी एक कहाणी' या दोन मालिकांमध्ये काम करत असताना माझं शिक्षण सुरु होतं. त्यानंतर 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा सिनेमा केल्यानंतर मी याक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१०ला 'शुभं करोति' ही शेवटची मालिका केली. मात्र या मालिकेनंतर मी नाटक, ट्रॅव्हल शो, सिनेमा या विविध गोष्टी केल्या. हे करताना आता फक्त सिनेमात काम करायचे या निर्णयावर मी जाऊन पोहोचले. मालिकेच्या सेटवर रोज जाऊन त्यातली एकच भूमिकेत मी रमू शकत नाही. त्यामुळे मी मालिकेपासून लांब राहिले.'
पुढे प्रिया म्हणाली, माझ्या या निर्णयाला उमेशचा पाठिंबा मिळाला. मी मालिकांमध्ये काम न करण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी उमेशनं मला सांगितलं, मी मालिकांमध्ये काम करतो, मात्र तू भूमिका विचारपूर्वक निवड.