सध्या अभिनेत्री रवीना टंडन चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी रवीना टंडनची मुंबईच्या वांद्रे परिसरातील भररस्त्यात काही स्थानिकांशी बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. रवीनाच्या कारने एका वृद्ध महिलेला धडक दिली आणि त्यानंतर ती मद्यधुंद अवस्थेत कारबाहेर येऊन लोकांशी वाद घालत होती, असे आरोप रवीनावर करण्यात आले होता. पण, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संपुर्ण सत्य समोर आलं. आता या प्रकरणात रवीना आणि तिच्या ड्रायव्हरला क्लीन चिट मिळाली आहे. यावर रवीना टंडनने पोस्ट शेअर केली आहे.
रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून आपल्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले आहे. शिवाय या घटनेतून काय धडा घेतला, हेदेखील तिने सांगितलं. रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरमध्ये लिहलं, 'प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यासाठी तुमचे खूप खूप आभार. 'मोरल ऑफ द स्टोरी…आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही लावून घ्या', असं तिने लिहलं.
रवीना टंडनच्या ड्रायव्हरवर कार चढवण्याचा आरोप
तर रवीना टंडनचा ड्रायव्हर रिझवी कॉलेजजवळ कार्टर रोडवर रॅश ड्रायव्हिंग करत होता. त्याने तीन जणांना मारहाण केल्याचा आरोप आहे. रवीनाला याबाबत विचारले असता, अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला. ती त्या अवस्थेत कार बाहेर आली आणि पीडितांना शिवीगाळ करून त्यांच्याशी भांडू लागली असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही पक्ष पोलिसांसमोर हजर झाले होते. पण, यानंतर घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं.
सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर
सीसीटीव्हीत असं दिसून आलं की संबंधित वृद्ध महिला ही रवीनाच्या कारजवळच उभी होती, मात्र त्यांना कारची धडक लागली नव्हती. या घटनेनंतर तिथल्या स्थानिकांनी रवीनाच्या कारला घेराव घातल्यानंतर तिने बाहेर येऊन जमावाशी बोलण्याचा प्रयत्न केला. 'कृपया मला मारू नका, माझ्या ड्राइव्हरला मारू नका', अशी ती विनंती करताना ती दिसून आली. मुंबई पोलिसांनीही रवीना टंडनच्या विरोधातली तक्रार खोटी असल्याचे सांगितले आहे. या घटनेमध्ये कुणालाही मारहाण झाली नसून शाब्दिक बाचाबाचीमुळे हा वाद वाढल्याचं पोलिसांनी सांगितलं.