उत्तम अभिनयशैली आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे (renuka shahane). अभिनयकौशल्याच्या जोरावर रेणुका शहाणे यांनी ९० चा काळ गाजवला. विशेष म्हणजे या मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने केवळ प्रेक्षकच नाही तर एका बॉलिवूड अभिनेत्याचही मनं जिंकली. रेणुकाने अभिनेता आशुतोष राणा (ashutosh rana) यांच्यासोबत लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.
रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांनी २००१ मध्ये लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे त्यांचा लग्नसोहळा हा शाही थाटामध्ये झाला होता. जवळपास आख्खं गाव त्यांच्या लग्नाला आलं होतं.परंतु, या लग्नात रेणुका शहाणे यांच्या आई-वडिलांनाच पोहोचता आलं नाही. त्यामुळे आई-वडील नसल्यामुळे आशुतोष राणा यांच्या बहिणीला रेणुकाचं कन्यादान करावं लागलं. हा किस्सा अलिकडेच त्यांनी एका कार्यक्रमात सांगितला.
"मी जेव्हा पहिल्यांदा यांच्या गावी गेले तेव्हा स्टेशनवर आमच्या स्वागतासाठी जवळपास हजार ते दीड हजार लोकांचा जमाव उपस्थित होता. इतकंच नाही तर ज्या हॉटेलमध्ये आमच्याकडच्या मंडळींच्या राहण्याची व्यवस्था केली होती. त्या हॉटेलचं उद्घाटनही माझ्या हस्तेच झालं होतं", असं रेणुका शहाणे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "ज्या ठिकाणी आमचं लग्न झालं त्याठिकाणी नेमके लाईट नव्हते. त्यामुळे अंधारातच मला लग्नाचा मेकअप करायला लागला. पण, या लग्नाला इतकी गर्दी होती की माझे आई-वडील सुद्धा मंडपापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे माझ्या नणंदेने माझं कन्यादान केलं."
दरम्यान, आशुतोष राणा आणि रेणुका यांची पहिली भेट १९९८ मध्ये एका सिनेमाच्या सेटवर झाली होती. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. या जोडीच्या लग्नाला २२ वर्ष झाली असून त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुलं आहेत.