पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. ते ७३ वर्षांचे होतं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भाजपने पुण्यात मोठा नेता गमावला आहे.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री रुचिता जाधवने देखील गिरीश बापट यांना सोशल मीडिया पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. रुचिताने गिरीश बापट यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही…वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार…तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही…भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ.