सध्या सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स (Influencers) असं म्हणवणारे अनेक जण जागोजागी दिसत आहेत. त्यांना एका रीलवर लाखो लाईक्स मिळत आहेत. याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांना थेट सिनेमांच्या ऑफरही मिळत आहेत. याच गोष्टीवर हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका सीमा पाहवा (Seema Pahwa) यांनी संताप व्यक्त केला आहे. इंडस्ट्रीत इतके वर्ष काम केल्यानंतर हे आता आलेले इन्फ्लुएन्सर्स बाजूला कसे उभे राहतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शार्दुल पंडितच्या पॉडकास्टमध्ये सीमा पाहवा म्हणाल्या, "आजकाल इन्फ्लुएन्सर्स हा नवा आजार आला आहे. मला वाटतं आम्ही तर हे क्षेत्रच सोडलं पाहिजे. कारण आम्ही त्यांच्यासोबत कसं उभं राहू शकतो. २० रील बनवून तुम्ही जी लोकप्रियता मिळवली आहे त्यासाठी मला ५० वर्ष लागली. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून कसं उभं राहत आहात. याचं मला दु:ख आहे. हे माझं इंडस्ट्रीला, कास्टिंग डायरेक्टर्सना, निर्मात्यांना सांगणं आहे की तुम्ही असं करु शकत नाही. प्रेक्षकांची यात चूक नाही कारण ते तर त्यांना रीलवर पाहत आहेत. पण जे निर्माते आहेत ते या इन्फ्लुएन्सर्सची लोकप्रियता पाहून त्यांचे लाईक्स पाहून त्यांना सिनेमात घेत आहेत."
सीमा पाहवा यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. 'बरेली की बर्फी', 'रामप्रसाद की तेरहवी', 'आँखो देखी', 'ड्रीम गर्ल 2', 'बधाई दो',' शुभमंगल सावधान', 'गंगूबाई काठियावाडी' अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. जवळपास ४० ते ४५ वर्षांपासून त्या या इंडस्ट्रीत काम करत आहेत. मात्र आता आलेल्या इन्फ्लुएन्सर्सना मिळणाऱ्या संधी बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. याची चूक निर्मात्यांचीच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.