Join us

"म्हणून माझ्या आईने माझी शाळाच बदलून टाकली...'; श्रिया पिळगांवकरने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 9:59 AM

लोकांना असं वाटतं की मला मराठी वाचता येत नाही.

मराठीतील लोकप्रिय जोडी सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर यांची 'एकुलती एक' मुलगी श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) ओटीटी माध्यम गाजवत आहे. तिच्या अनेक हिंदी वेब सीरिज ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये असतात. मिर्झापूर, द ब्रोकन, ताजा खबर अशा अनेक सीरिज मध्ये श्रिया झळकली. श्रिया मराठमोळी मुलगी असूनही तिने हिंदीमध्ये आपला डंका गाजवला आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने मराठी माध्यमावर चर्चा केली आहे.

श्रियाने नुकतंच 'व्हायफळ' ला दिलेल्या मुलाखतीत लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, "लोकांना असं वाटतं की मला मराठी वाचता येत नाही. तेव्हा माझं असं होतं की का नाही येणार मला मराठी. पण हा प्रश्न लोकांना पडूच शकतो कारण असे काही माझेही महाराष्ट्रीयन मित्र आहेत ज्यांना मराठी वाचताच येत नाही. पण मला ते येतं याचं कारण म्हणजे मी ज्या शाळेत होते तिथे पाचवीनंतर ते सिलेबसमध्ये मराठी विषय ठेवणार नव्हते.कारण ती आयसीएसई(ICSE) शाळा होती. मग आईने मला मुद्दाम माझी शाळा बदलून मला एसएससी(SSC) शाळेत घातलं. कारण मराठी हा विषय शाळेत असलाच पाहिजे. त्यामुळे नक्कीच मला मराठी वाचता येतं लिहिता येतं प्रश्नच येत नाही."

श्रियाचा नुकताच ड्राय डे सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. यामध्ये तिने अभिनेता जितेंद्र कुमारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. श्रिया ओटीटी माध्यमात रुळली असली तरी तिला पुन्हा मराठीत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. श्रियाने 'एकुलती एक' या मराठी सिनेमातून पदार्पण केलं होतं. नंतर तिने शाहरुख खानच्या 'फॅन' सिनेमातून हिंदीत पदार्पण केलं. यानंतर श्रियाला हिंदी सीरिजच्या ऑफर्स मिळत गेल्या. 

टॅग्स :श्रिया पिळगावकरसुप्रिया पिळगांवकरमराठी अभिनेतावेबसीरिजशाळा