Join us

'कान्स' गाजवून स्मिता पाटील यांचा 'मंथन' सिनेमा या तारखेला भारतात पुन्हा होतोय रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 4:59 PM

'कान्स' फिल्म फेस्टिव्हल गाजवून स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाहांचा मंथन सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे (manthan, smita patil)

'कान्स फिल्म फेस्टिव्हल' सध्या सुरु आहे. या फेस्टिव्हलमध्ये केवळ भारतातील नव्हे तर जगभरातले सिनेमे दाखवले जातात. यंदाच्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये स्मिता पाटील यांचा गाजलेल्या 'मंथन' सिनेमाचा प्रिमियर झाला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'मंथन' सिनेमाचं चांगलंच कौतुक झालं. त्यावेळी नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह उपस्थित होते. आता कान्स गाजवून स्मिता पाटील यांचा 'मंथन' सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.  

या तारखेला 'मंथन' सिनेमागृहांमध्ये होणार रिलीज

श्याम बेनेगल यांचा १९७६ साली आलेला 'मंथन' हा एक क्लासिक सिनेमा. वर्ल्ड प्रिमियर हेरिटेज फाऊंडेशन द्वारे 'मंथन' सिनेमाचा कान्समध्ये प्रिमियर झाला. कान्समध्ये हा सिनेमा प्रचंड गाजला. आता फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड द्वारे 'मंथन' सिनेमागृहांमध्ये पुन्हा रिलीज होणार आहे. PVR-INOX लिमिटेड फेडरेशन लिमिटेडच्या सहकार्याने सिनेपोलीस इंडियामध्ये १ आणि २ जून २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

कुठे बघायला मिळेल?

सिनेपोलीस इंडियातर्फे संपूर्ण भारतात १ आणि २ जूनला संपूर्ण भारतातील ५० शहरांतील १०० सिनेमागृहांमध्ये 'मंथन' सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे स्मिता पाटील, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह यांचा हा क्लासिक सिनेमा पाहण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. हा सिनेमा तब्बल ५० हजार शेतकऱ्यांनी दिलेल्या लोकवर्गणीतून तयार झालेला सिनेमा होता. आता हा सिनेमा मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :स्मिता पाटीलनसिरुद्दीन शाहओम पुरीशबाना आझमीश्याम बेनेगलगोविंद निहलानी