स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'जोगवा', '७२-माईल्स', 'परतु', 'देऊळ' यासह विविध मराठी सिनेमात तसंच 'सिंघम रिटर्न्स', 'रुख' अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाने स्मितान आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तसेच स्मिता तांबे आपल्या सामाजिक जाणिवां विषयी सजग असते. नुकतीच ती ‘कोस्टल बीच क्लिनिंग’मध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसली.
स्मिता तांबे म्हणते, “मी मढला राहते. आणि मढ बीचला मॉर्निंग वॉकला येताना इथे असलेलं प्लॅस्टिकचं साम्राज्य आणि अस्वच्छ होत चाललेला समुद्रकिनारा याने धड चालताही येत नसल्याची जाणीव होत होती. जरी पालिकेचे कर्मचारी तो कचरा उचलण्यासाठी येत असले, तरीही हा कचरा इतक्या महिन्यांचा किंवा वर्षाचा आहे, की ह्याला जास्त हातांची गरज आहे, हे लक्षात आलं. आणि मग बीच क्लिनिंगमध्ये मी सहभाग घेतला.”
स्मिता पूढे म्हणाली, “सण-वार आले की आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो. पण आपल्या घराच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीही आपले हात पूढे सरसावण्याची गरज आहे. ब-याचदा गणपती विसर्जनानंतर अनेकजण समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी सरसावतात. पण मुंबईच्या समुद्रकिना-यावर असलेलं प्लॅस्टिकचं साम्राज्य पाहता, समुद्रकिनारा अधुमधून स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.”