सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. त्यातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.
सोनाली तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोनाली सध्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत भ्रमंती करतेय. सोनालीने भारत- पाकिस्तानच्या सीमेवरील वाघा बॉर्डरला भेट दिली. या दरम्यानचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलं आहेत.
इतक्या वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली...#wagahborder वरचा उत्साह पाहून खूप आनंद झाला. पुढे तिने म्हटलंय कि, ''देशभक्ती खऱ्या अर्थाने इथं वाहते. इथे आलं कि ऊर्जा आणि अभिमान तुमच्यामध्ये अक्षरशः जागा होतो.''
सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केल आहे. त्यामुळे सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. त्यामुळे वाघा बॉर्डरला भेट देणं त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे.