Join us

'इतर महिलांना दुखावण्याचा हेतू नव्हता'; सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 12:20 PM

Sonali Kulkarni: तिच्या या वक्तव्यानंतर समस्त स्त्रियांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी सोनालीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने अलिकडेच स्त्रियांविषयी एक वक्तव्य केलं होतं. भारतीय स्त्रिया आळशी असतात, असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर समस्त स्त्रियांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी सोनालीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घडलेल्या प्रकारानंतर सोनालीने एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

सोनाली कलाविश्वासह सामाजिक क्षेत्रातही चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या बऱ्याचशा मुद्द्यावर उघडपणे तिचं मत व्यक्त करत असते. यात अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, दरवेळी ती रोषाला समोरं जाऊन तिचं मत स्पष्टपणे मांडत असते. यावेळीदेखील तिने तिचं मत जाहीरपणे मांडलं. मात्र, तिला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं.

सोनालीने मागितली माफी

मोठ्या प्रमाणावर झालेल्या ट्रोलिंगनंतर सोनालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचं मत मांडलं असून माफीही मागितली आहे. "मला मिळत असलेल्या प्रतिसादाने मी भारावून गेले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्या, खासकरुन मीडिया, प्रेस या सगळ्यांचे मी आभार मानते. कारण, त्यांनी खूप समंजसपणे आणि भान राखत हे प्रकरण हाताळलं. मी स्वत: एक स्त्री आहे. त्यामुळे इतर स्त्रियांना दुखावण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता.  खरं तर, आपल्या समर्थनार्थ एक स्त्री असणं म्हणजे काय ते मी वेळोवेळी व्यक्त केलं आहे. वैयक्तिररित्या कौतुक करण्यासाठी वा टीका करण्यासाठी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. आणि आपण आपल्या विचारांची मुक्तपणे देवाणघेवाण करु शकू अशी आशा बाळगते", असं सोनाली म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझ्या वक्त्यव्यामुळे जर नकळत कोणाला वेदना झाल्या असतील, तर मी मनापासून माफी मागू इच्छितो. मला ब्रेकिंग न्यूज आणि हेडलाईन्स भाग व्हायचे नाही. मी एक खूप आशावादी आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की जीवन खरोखर सुंदर आहे. तुमच्या संयम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे."

नेमकं काय म्हणाली होती सोनाली? 

अलिकडेच सोनालीने स्त्री-पुरुष समानतेवर आधारित एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी, 'भारतीय स्त्रिया आळशी झाल्या आहेत, त्यांना चांगला कमावणार नवरा किंवा बॉयफ्रेंड हवा आहे. पण स्वतः ला काय करायचे हे माहीत नाही, असं सोनाली म्हणाली. तिच्या या वाक्याचा वेगवेगळा अर्थ काढत अनेकांनी तिला ट्रोल केलं. इतकंच नाही तर तिचा हा व्हिडीओदेखील व्हायरल केला. यामध्ये उर्फी जावेदनेही सोनालीला ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी