काही दिवसांपुर्वी CISF जवान महिलेने कंगना रणौतला चंदीगढ एअरपोर्टवर कानशिलात लगावली. कंगना रणौतने शेतकरी आंदोलनादरम्यान जे वक्तव्य केलं होतं, त्याविरोधात CISF जवान महिलेने निषेध व्यक्त करत कंगनाला मारलं. हे प्रकरण देशभर चांगलंच तापलं. या घटनेवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच अभिनोत्री स्वरा भास्करने या प्रकरणावर तिची स्पष्ट प्रतिक्रिया देत मौन सोडलंय.
स्वरा भास्कर कंगनाच्या थप्पड प्रकरणावर काय म्हणाली?
स्वरा भास्करने अलीकडेच एका मुलाखतीत या प्रकरणावर तिची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. स्वरा सांगते की, “कंगनाला कानशिलात मारली गेली, जे घडायला नको होतं. पण किमान ती जिवंत आहे आणि तिच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक आहेत. या देशात विविध घटनांमध्ये किती लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांची हत्या करण्यात आली, ट्रेनमध्ये त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. दंगलीत कितीतरी लोक मारले गेले आहेत. अशा घटनांची नोंदही झाली आहे. जे लोक या सर्व कृतींचे समर्थन करत आहेत, त्यांनी कंगनाच्या प्रकरणात आम्हाला शिकवू नका."
कंगनानेच हिंसाचाराचे समर्थन केलं होतं: स्वरा
पुढे स्वराने कंगनाच्या एका जुन्या विधानावर भाष्य केलं. स्वरा म्हणाली, "ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने ख्रिस रॉकला कानशिलात मारली होती. तेव्हा कंगनाने ट्विट करुन या प्रकरणाचं समर्थन केलं होतं. कंगनाच्या बाबतीत अडचण अशी आहे की, तिने स्वतः या हिंसाचाराचे समर्थन केले आहे. कंगना म्हणाली होती की, जर कोणी तिच्या आई आणि बहिणीबद्दल बोलले तर ती त्यांना कानाखाली मारेल. मग ही घटना झाल्यावर आता काय बोलणार? कंगनाच्या बाबतीत जे काही झाले ते योग्य नव्हते. मात्र ज्या व्यक्तीने हे केले तिला निलंबित करण्यात आले आहे, त्यामुळे न्याय झाला आहे."