दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला गेला. दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर भाविकांनी भावुक होत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींच्या अगदी थाटात मिरवणुका निघाल्या. तर मुंबईतही लालबाग-परळमधील गणपतींच्या मिरवणुकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाची विसर्जन मिरवणुक हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे.
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदाही राजाला विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा प्रसिद्ध अभिनेता आदेश बांदेकर आणि त्यांचा लेक सोहम बांदेकरही सहभागी झाले होते.
या मिरवणुकीत आदेश बांदेकर बेभान होऊन नाचताना दिसले. तर सोहमनेही ठेका धरला होता. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, लालबागच्या राजाचं आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.