'आधी लगीन कोंढाण्याचं…', 'सुभेदार' चित्रपट 'या' दिवशी भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 04:27 PM2023-07-25T16:27:51+5:302023-07-25T16:30:06+5:30
Subhedar Movie : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टिमने प्रचंड मेहनतीने 'सुभेदार'च्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक सुवर्णपान रसिकांसमोर उलगडण्याचं काम केलं आहे.
सुभेदार तान्हाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन रायगडावर गेले होते. तिथे चिंतातूर अवस्थेतील जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पाहिलं. स्वराज्यावर आलेला बाका प्रसंग ओळखून ते स्वत: कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला सज्ज झाले. बेलभंडारा उचलून, हात उंचावून 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' अशी शपथ त्यांनी घेतली. स्वामीनिष्ठेचं अजोड उदाहरण असलेला हा प्रसंग प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयावर कायमचा कोरला गेलेला आहे. तो प्रसंग हुबेहुब डोळ्यांसमोर उभं करणारं ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्यातून अवतरलेलं चित्र आपण बालपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाहिलं आहे. शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. त्या गाजलेल्या चित्रावरून प्रेरित होऊन नवीन पिढीसाठी हा प्रसंग 'सुभेदार' या महत्त्वाकांक्षी आगामी चित्रपटात चलचित्ररूपात पहायला मिळणार आहे.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टिमने प्रचंड मेहनतीने 'सुभेदार'च्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक सुवर्णपान रसिकांसमोर उलगडण्याचं काम केलं आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय पूरकरांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या 'सुभेदार' चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड 'सुभेदार' चित्रपटाचे निर्माते आहेत.