मुंबई - सिनेअभिनेता प्रभासचा बहुचर्चित सिनेमा आदिपुरुष प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीव्हीवर या सिनेमाचा टीझर पाहून यातील VFX वर टीका होत आहे. त्याशिवाय सैफ अली खाननं साकारलेल्या रावणाचा लूक पाहून त्याची तुलना लोकांना अल्लाउद्दिन खिलजी आणि मुघल सुल्तानशी केली आहे. हा वाद संपला नाही तोवर आता हनुमानाच्या वस्त्रावरून मध्य प्रदेशच्या मंत्र्याचा राग अनावर झाला आहे.
मध्य प्रदेशचे मंत्री इतके संतापले की, जर या सिनेमातून दृश्य हटवले गेले नाही तर कायदेशीर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी प्रभासच्या सिनेमातील हनुमानाच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. हनुमानाच्या अंगवस्त्रावरून त्यांनी निषेध केला आहे. त्यांचा दावा आहे की, या सिनेमात हनुमानाला जे अंगवस्त्र परिधान करून दाखवण्यात आले आहे ते चमड्याचे आहे. सिनेमा निर्मात्यांनी ही दृश्य काढून टाकावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला.
टिझर रिलीज झाल्यापासून वादप्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. चाहते खूप दिवसांपासून या टीझरची वाट पाहत होते. मात्र टीझर आल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडलं. याचे कारण म्हणजे चित्रपटाचे VFX. आदिपुरुषच्या टीझरमध्ये, प्रभास, प्रभू रामच्या भूमिकेत दिसतोय. तर क्रिती सेनॉन (Kriti Senon) सीतेच्या भूमिकेत दिसतेय. त्यांच्यासोबत वानरसेनाही आहे. ही सर्व दृश्ये एखाद्या अॅनिमेशन चित्रपटातील वाटत असली तरी लाइव्ह अॅक्शन फिल्मची नाही. VFX पाहताच युजर्सनी टीझरला ट्रोल करायला सुरुवात केली. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ही चूक लवकर दुरुस्त करावी, असे यूजर्सचे म्हणणे आहे. अनेक युजर्सनी या टीझरच्या व्हीएफएक्सची खिल्ली उडवली असून याला टेम्पल रन गेम म्हटले आहे. चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. VFX च्या कामावर २५० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू रामांची, क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान, रावण आणि सनी सिंह निज्जर लक्ष्मणच्या भूमिकेत आहेत. आदिपुरुष १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे.
रावणाच्या भूमिकेवरूनही फटकारलंअखिल भारत हिंदू महासभा/संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनीही सैफनं साकारलेल्या रावणाच्या लूकचा निषेध केला आहे. ते म्हणाले, 'आदिपुरुषमध्ये दाखवण्यात आलेला सैफ अली खान लंकापती रावणाऐवजी अतिरेकी खिलजी किंवा चंगेज खान किंवा औरंगजेबसारखा दिसत आहे. हिंदू संस्कृती आणि पौराणिक पात्रांशी छेडछाड सहन होत नाही. याशिवाय भाजपच्या प्रवक्त्या मालविका यांनीही आदिपुरुषवर टीका केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली, 'वाल्मिकीचा रावण, इतिहासातील रावण, लंकाधिपती, ६४ कलांमध्ये पारंगत असलेला महाशिवभक्त. आपल्या सिंहासनात ९ ग्रह बसवले होते. थायलंडचे लोक रामायणावर किती सुंदर नृत्य करतात. मग हे कार्टून बनवायची काय गरज होती? हे खरच तैमूरचे वडील आहेत. बॉलीवूडचे लोक किती मूर्ख आहेत. थोडेही संशोधन करू शकत नाही,' अशी पोस्ट त्यांनी केली.