ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाचा वाद संपता संपत नाही. सिनेमातील राम, सीता, लक्ष्मण, रावण, हनुमान यांच्या लुकवरुन तसंच डायलॉगवरुनही टीका झाली. प्रेक्षकांचा राग आता अनावर होत चालला आहे. नुकतेच सिनेमातील संवाद बदलण्यात आले आहेत. तरी सुधारित संवादही प्रेक्षकांच्या पचनी पडलेले नाही. रामानंद सागर यांच्या 1987 साली आलेल्या रामायणात लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी (Sunil Lahri) यांनी आदिपुरुषवर राग व्यक्त केला आहे.
अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आगामी 'द इन्कार्नेशन ऑफ सीता' (The Incarnation Of Sita) सिनेमात सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान अभिनेते सुनील लहरी एका मुलाखतीत म्हणाले, 'माता सीताची भूमिका साकारण्यात आलिया भटकडूनही फार काही अपेक्षा नाही. पण कंगना रणौतकडून मला खूप अपेक्षा आहे की ती आदिपुरुष सारखी चूक करणार नाही. माझ्या मते कंगना सीतेची भूमिका चांगल्या प्रकारे निभावेल.' सोबतच संस्कृतीशी छेडछाड करु नका अशी ताकीद सुनील लहरी यांनी दिली आहे.
सुनील लहरी यांनी दाखवलेल्या विश्वासानंतर कंगना रणौतनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने फोटो शेअर करत हात जोडल्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. दिग्दर्शक अलौकिक देसाई यांच्या 'द इन्कार्नेशन ऑफ सीता' सिनेमात काम करत आहे. 2021 मध्येच सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. केवी विजयेंद्र प्रसाद यांनी सिनेमाची कहाणी लिहिली आहे.