Join us

'जलेगी तेरे बाप की...' डायलॉगनंतर आता लेखकाचं आणखी एक वक्तव्य, 'हनुमान देव नाही तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 1:21 PM

मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे.

'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाचा वाद वाढतच चालला आहे. सिनेमातील डायलॉग्स प्रेक्षकांना सर्वात जास्त खटकले आहेत. विशेषत: हनुमानाच्या संवादांवर प्रेक्षकांचा आक्षेप आहे. परिणामी संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir)   निशाण्यावर आले आहेत. प्रेक्षकांचा संताप पाहूनही आदिपुरुषचे मेकर्स मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. संवाद आजच्या पिढीला समजतील अशा शब्दात लिहिण्यात आले असं म्हणत ते स्वत:चाच बचाव करत आहेत. आता लेखक मनोज मुंतशीर यांच्या आणखी एका विधानाने खळबळ उडाली आहे.

मनोज मुंतशीर यांनी एका मुलाखतीत हनुमानाविषयी विधान केलं ज्याने नेटकरी अजूनच भडकले. सिनेमातही 'जलेगी तेरे बाप की..' अशा प्रकारचे डायलॉग हनुमानाच्या तोंडी दाखवल्यानंतर मनोज मुंतशीर यांनी नवं विधान करत आणखी एका वादाला निमंत्रण दिलंय. आज तकला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंतशीर म्हणाले, 'हनुमानाचे संवाद श्रीरामासारखे नाहीत कारण हनुमान देव नाही तर भक्त आहेत. आपण हनुमानाला देव मानतो कारण त्यांच्या भक्तीत ती शक्ती होती.'

मुंतशीर यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमधून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. अनेकांनी मुंतशीर यांना मुलाखतीच देऊ नको असा सल्ला दिला. 'डोकं खराब झालंय याचं...भगवान हनुमान शंकराचंच रुप आहे' अशी एकाने कमेंट केली. तर आणखी एकाने लिहिले, 'मनोज मुंतशीरने सर्वात आधी मुलाखती देणंच बंद केलं पाहिजे','कृपया कोणी याला शांत बसवा' अशा शब्दात मुंतशीर यांना खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांची सुरक्षा 

मनोज मुंतशीर यांना होत असलेला वाढता विरोध पाहता त्यांना मुंबई पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे. सुरक्षा मिळावी असा अर्ज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांना केला होता. त्यानुसार आता प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत एक जवान असणार आहे. तसंच त्यांच्या घराबाहेर आणि ऑफिसबाहेरही सुरक्षाव्यवस्था तैनात असणार आहे.

टॅग्स :आदिपुरूषदेवदत्त नागेरामायण