Arun Govil on Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपट रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील संवाद आक्षेपार्ह असल्याचा प्रेक्षकांचा आरोप आहे. तसेच रामायणातील पात्रही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे म्हणने आहे. या वादानंतर चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर आपली बाजू मांडत आहेत. दरम्यान, या चित्रपटावर आता रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
अरुण गोविल यांनी 1987 मध्ये 'रामायण' या टीव्ही मालिकेत मर्यादा पुरुषोत्तम श्री रामची भूमिका साकारून देशभरात ओळख निर्माण केली होती. आजही त्यांना राम नावाने ओळखले जाते. त्यांचे अनेक चाहते आहेत, जे त्यांना रामाच्या रुपात पाहतात. आजही चाहते अरुण गोविल यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतात. दरम्यान, अरुण गोविल यांना आदिपुरुष चित्रपट फारसा आवडलेला नाही.
काय म्हणाले अरुण गोविल?अरुण गोविल म्हणाले की, 'गेल्या अनेक दिवसांपासून आदिपुरुषाबद्दल खूप काही बोलले आणि ऐकले जात आहे. मात्र, हे प्रकरण थोडे ताणले गेल्याचे दिसते. आदिपुरुषकडे फक्त चित्रपट म्हणून बघितले आणि तो रामायणावर आधारित नाही, असे म्हटले तर हा चित्रपट चांगला आहे. पण मुद्दा हा आहे की, तुम्ही 'रामायण' म्हणून हा चित्रपट दाखवत आहात. ज्या पात्रांना आपण देव मानतो, जे आपल्या संस्कृतीशी घट्टा जोडले गेले आहेत, त्या पात्रांना चुकीच्या पद्धतीने दाखव्यात आले आहे. क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली काहीही केलेले लोकांसह मलाही आवडले नाही."
'माझ्या मनात श्रीरामाचे जे रुप आहे, मला त्याच रुपात त्यांना पाहायचे आहे. देव पौराणिक किंवा आधुनिक नसतात, देव आदी अनंत आहेत. मी अद्याप चित्रपट पाहिला नाही, पण चित्रपटातील पाच-सहा ओळी ऐकल्या आहेत. मी अशी भाषा कधीही वापरत नाही. सामान्य चित्रपट असता तर अशाप्रकारच्या संवादाने काहीही फरक पडला नसता. आजकाल चित्रपटात याहीपेक्षा वाईट संवाद असतात. चित्रपटातही शिवीगाळ असते. पण रामायणातील पात्रांच्या तोंडून असे बोलणे योग्य नाही. '
'निर्मात्यांनी हे जाणुनबूजून केले नसावे, असे मला वाटते. त्यांनी क्रिएटीव्ह लिबर्टी घेतली, जी लोकांना आवडली नाही. पण, मी मनोज मुंतशीर यांचे ट्विट वाचले, त्यांनी संवाद बदलणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय खूप चांगला आहे. पण जे नुकसान व्हायचे ते आधीच झाले आहे. पण तरीही ही गोष्ट त्यांच्या मनात आली, त्यांनी सर्वांच्या भावनांचा आदर केला आहे. कोणीही ठरवून देवाचा अपमान करत नाही. पण चित्रपटातील काही ओळींमध्ये संवेदनशीलतेचा अभाव नक्कीच आहे,' अशी प्रतिक्रिया अरुण गोविल यांनी दिली.