Adipurush Movie : प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपट 16 जून रोजी रिलीज झाला. पण, चित्रपटाला प्रेक्षकांकडून अतिशय वाईट रिव्ह्यू मिळाले आहेत. बहुतांश चाहत्यांना चित्रपटातील संवाद, कलाकारांचे लूक्स आणि VFX आवडले नाहीत. मात्र रामायणाची कथा आणि प्रभासच्या स्टारडममुळे चित्रपटाने पहिल्या दोन दिवसात बक्कळ कमाई केली आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण, प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांवर चित्रपट अपयशी ठरला. चित्रपट प्रदर्शित होताच त्याच्या डायलॉग आणि व्हीएफएक्सवर जोरदार टीका झाली. पण आदिपुरुषला पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग मिळाली. आदिपुरुषे पहिल्या दिवशी जगभरात सुमारे 140 कोटी रुपयांची कमाई केली. तर, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला. अशाप्रकारे आदिपुरुषने दोन दिवसांत सुमारे 240 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण, हिट होण्यासाठी चित्रपटाला अजून मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
चित्रपटातील संवाद बदलणार'आदिपुरुष'च्या संवादांवर सातत्याने टीका होत आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी संवादांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज मुंतशीर यांनी आदिपुरुषचे संवाद लिहिले असून चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे. संवादावरुन झालेल्या टीकेनंतर आता 'आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की' आणि 'तेरी बुआ का बगीचा है क्या, जो हवा खाने चला आया', अशाप्रकारचे संवाद बदलले जाणार आहेत. आता यात काय सुधारणा करणार, हे पाहणे महत्वाचे आहे.