Join us

Adipurush : हे कसं विसरू शकता...? ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेला लुक पाहून संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:16 PM

Adipurush Poster Troll: ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत असताना निर्मात्यांनी काल राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज केलं. आता या पोस्टरवरही चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Adipurush Poster Troll: दिग्दर्शक ओम राऊत यांचा आगामी 'आदिपुरुष' सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून नकारात्मक कारणानं चर्चेत आहे. आधी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि लोकांची पार निराशा झाली. टीझरला जबरदस्त ट्रोल केलं गेलं. सिनेमातील रावण आणि हनुमानाचा लुक लोकांना काही केल्या पचनी पडला नाही. यातील व्हिएफएक्स सीन्सचीही प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. ‘आदिपुरूष’ अशा नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता निर्मात्यांनी काल राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज केलं. आता या पोस्टरवरही चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  ट्विटरवर #Adipurush ट्रेंड होतोय. या हॅशटॅगअंतर्गत हजारो ट्विट्स आहेत. यातील अनेक ट्विट्समध्ये युजर्सनी आदिपुरूषच्या पोस्टरवर नाराजी व्यक्त केली आहे.

क्रितीचा लुक पाहून भडकले युजर्स‘आदिपुरूष’मधील सैफ अली खानचा लुक युजर्सला आवडला नव्हता. आता त्यांनी क्रिती सॅननच्या लुकवरही आक्षेप घेतला आहे. काल रिलीज करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’च्या पोस्टरमध्ये सीतेच्या भांगेत कुंकू नाही. नेमकी हीच बाब नेटकऱ्यांना खटकली आहे. शिवाय हनुमानाच्या लुकवरही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. ‘सीता मातेच्या भांगेत कुंकू नाही, हे कसं विसरू शकता,’ असं ट्वीट एका युजरने केलंय. सीता मातेच्या भांगेत कुंकूचं नाही. या प्रोजेक्टमध्ये मनोज मुंतशीर देखील आहे, यावर विश्वास बसत नाही, अशी कमेंट एका युजरने केली.

काही युजर्सनी हनुमानाच्या लुकवर संताप व्यक्त केला आहे. बॉलिवूड आमच्या धर्मावर आघात करत आहेत. त्याऐवजी अरुण गोविल यांचे रामायण पाहा,’ असं एका युजरने म्हटलंय. काहींनी ओम राऊतला ट्रोल केलं आहे. ओम राऊत तू आदिपुरूषसोबत हे चांगलं केलंस, रामजी अंकलसारखे वाटतं आहेत. सीमा जी मॉडेलसारखी आणि लक्ष्मणाला पाहून नकारात्मक भावना येत आहेत. सिनेमा करण्याआधी जरा अभ्यास तर करायचास, अशा शब्दांत एका युजरने दिग्दर्शक ओम राऊतला फैलावर घेतलं आहे.

‘आदिपुरूष’च्या टीझरला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद पाहून मेकर्सने सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला होता. आधी हा सिनेमा १२ जानेवारीलाच प्रदर्शित होणार होता. मात्र टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर ओम राऊतच्या या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. टीझरमधील व्हीएफएक्स इफेक्टवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. लोकांची ही नाराजी बघता मेकर्सनी व्हीएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. आता हा सिनेमा येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बिग बजेट चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभू श्री रामची भूमिका अभिनेता प्रभास साकारणार आहे. सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेसाठी आणि चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी क्रिती ची निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉनबॉलिवूडट्विटर