सध्या देशात कोणता वादाचा मुद्दा आहे तर तो 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा. टीझर आल्यापासूनच हा सिनेमा वादात सापडला आहे. रामायणाची मोडतोड करुन सिनेमा दाखवण्यात आला असून हनुमानाच्या तोंडी वाईट भाषा दाखवल्यामुळे प्रेक्षक भडकले आहेत. तर नुकतंच आता पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यातील एका थिएटरमध्ये हिंदू संघटनांनी शोच बंद पाडला.
'आदिपुरुष' सिनेमावरुन वाद आता वाढतच चालला आहे. 'जलेगी तेरे बाप की' अशा प्रकारचे डायलॉग हनुमानाला देण्यात आले. हे कोणाच्याच पचनी पडलं नाही. याविरोधात आता हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. काल नालासोपाऱ्यातील एका थिएटरमध्ये कार्यकर्त्यांनी शो बंद पाडत जय श्री रामाच्या घोषणा दिल्या. यावेळी सिनेमागृहातील कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत बघितलं तर आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. 'देवदेवतांचा अशाप्रकारे अपमान सहन करणार नाही, लहान मुलांना हीच शिकवण देणार का? आम्ही विरोध करणारच असं म्हणत आंदोलनकर्त्यांनी सिनेमाला विरोध दर्शवला आहे.
आदिपुरुष'चा वाद जितका वाढतोय तितकाच सिनेमाला फायदा होतोय. प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. तर नुकतंच मेकर्सने संवाद बदलणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे यापुढे सुधारित संवादांसह सिनेमा थिएटरमध्ये दाखवण्यात येणार आहे.