दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा या जगात नाहीत. 20 एप्रिल रोजी मुंबईत त्यांचं निधन झाले. पामेला यांच्या निधनामुळे चोप्रा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमिताभ बच्चन यांच्या पासून ते शाहरुख खानपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार राणी आदित्य चोप्रा व उदय चोप्राची भेट घेत त्यांचं सांत्वन करत आहेत. राणीचा पती व चित्रपट निर्माता आदित्य हा आईच्या खूप जवळ होता. आईच्या निधनाचा त्याला मोठा धक्का बसला आहे.
एबीपी लाइव्हने चोप्रा कुटुंबातील एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने वृत्त दिलंय. “आदित्य जास्त बोलत नाहीये. तसा ही तो कमीच बोलतो. आईच्या जाण्याने तो पूर्णपणे तुटला आहे. यादरम्यान त्याची पत्नी राणी मुखर्जी पूर्णपणे आदित्यची काळजी घेत आहे. पामेला चोप्रा यांच्याकडे खूप कमी वेळ असल्याची जाणीव कुटुंबियांना होती. त्या गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. असे होणार हे आदित्यला माहीत होते पण तरीही आई वडिलांचं जाणं स्वीकारणं खूप कठीण असतं,” असं चोप्रा कुटुंबातील मित्राने सांगितलं.
“उदय आणि आदित्य दोन्ही भावांपैकी आदित्य त्याच्या आईच्या खूप जवळ होता आणि तिच्यावर अवलंबून होता. विशेषत: यशजींच्या निधनानंतर तो सर्व महत्त्वाचे निर्णय आईचा सल्ला घेऊनच घ्यायचा. पण आता त्याही नाहीत, त्यामुळे आदित्यला धक्का बसला आहे. संपूर्ण चोप्रा कुटुंब ‘पठाण’च्या यशाने आनंदी होते, अशातच पामेला चोप्रांचं निधन झालं. अलीकडच्या काळात बॅनरला आलेल्या अपयशाची त्यांना काळजी वाटत होती. पण ‘पठाण’ने चेहऱ्यावरील हास्य परत आणले,” असंही चोप्रा कुटुंबाच्या मित्राने सांगितलं.