नवरात्री उत्सव प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. कोणी देवीची आराधना, घटस्थापना, उपवास, देवदर्शन आणि देवीचा जागर करून तर कोणी भोंडला, हादगा खेळून नवरात्रौत्सव साजरा करतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने नवरात्रौत्सव साजरा करण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री आदिती द्रविड मात्र यंदा नवरात्रौत्सव खूपच वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. आदितीच्या ‘यु अॅण्ड मी’ अल्बमला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. एकीकडे प्रसिद्धीच्या झोतात असतानाच अदितीने समाजाचे देणे, समाजालाच परत करण्यासाठी आपली ‘फ्लाय हाय’ ही समाजसेवी संस्था सुरू केली आहे. आपल्या ह्या संस्थेद्वारे तिने समाजोपयोगी कामे हाती घेण्याचा संकल्प सोडलाय. नुकतेच तिने पुण्याजवळच्या किर्कवाडीमधल्या ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतल्या मुलींसाठी 150 सॅनिटरी नॅपकिन असलेले स्वयंचलित मशीन दान केले आहे.
आदिती म्हणते, “नवरात्रीला आपल्याकडे कन्यापूजा करण्याची पद्धत आहे. ही माझ्या पद्धतीने थोड्या वेगळ्या प्रकारची कन्यापूजा आहे. मला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली. तेव्हा आई घरात नव्हती आणि मला होणाऱ्या त्रासाबद्दल मी बाबांशी बोलले होते. माझ्या घरात मोकळे वातावरण असल्याने हे शक्य होते. पण बाकी मुली अशा पद्धतीने आपले वडिलच काय बऱ्याचदा आई-बहिण-मैत्रीणींशीही बोलायला लाजतात. सॅनिटरी नॅपकिनविषयी छोट्या गावातल्या मुलींना माहितही नसते.”
आदिती पूढे सांगते, “बऱ्याच काळापासून ही गोष्ट माझ्या मनात होती. म्हणूनच माझ्या समाजसेवी संस्थेव्दारे पहिले काम हाती घेताना मी पुण्याजवळच्या ज्ञानमंदिर शाळेची निवड केली. सॅनिटरी नॅपकिन मशिन दिल्यावर तिथल्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांनी स्वत:च्या हाताने माझ्यासाठी लिहीलेले थँक्यु ग्रिटींग कार्ड मला खूप काही सांगून गेले. हजार कन्यापूजेपेक्षा 100 मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्याचे समाधान मी शब्दात सांगू शकत नाही.”