करण जोहरचा मल्टीस्टारर 'कलंक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. अभिषेक वर्मनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने 20 वर्षानंतर माधुरी-संजय दत्त एकत्र आले आहेत. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. आशिकी फेम आदित्य रॉय कपूरने तर या चित्रपटात खूपच चांगला अभिनय केला असल्याचे म्हटले जात आहे.
आदित्य रॉय कपूरने व्हीजे म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला व्हीजे म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्याचदरम्यान त्याला लंडन ड्रीम्स या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी सांगण्यात आले आणि त्याला हा चित्रपट मिळाला. या चित्रपटातील त्याची भूमिका छोटीशी असली तरी या भूमिकेचे कौतुक झाले होते. त्याने यानंतर अॅक्शन रिप्ले, गुजारिश यांसारख्या चित्रपटात काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता आशिकी 2 या चित्रपटामुळे मिळाली. त्याची या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. यानंतर त्याला एकही हिट चित्रपट देता आला नाही.
गेल्या दोन वर्षांपासून तर तो अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. दोन वर्षांच्या या ब्रेकमध्ये आदित्यने काय केले हे त्याने आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. या ब्रेकमुळे त्याला अभिनय सुधारण्यासाठी वाव मिळाला असे त्याने सांगितले आहे. तो सांगतो, मी दोन वर्षांनंतर चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याने खूपच खूश होतो. मी जो ब्रेक घेतला, तो माझ्यासाठी खूपच चांगला ठरला. या दरम्यान अभिनय चांगला व्हावा यासाठी काय केले पाहिजे यावर मी अभ्यास केला. एक कलाकार म्हणून ज्यावेळी तुम्ही दररोज काम करत असता त्यावेळी एखादी भावना व्यक्त करताना काय केले पाहिजे हे तुमच्या डोक्यात पक्के असते. त्यामुळे काही काळाने तुमचा अभिनय नैसर्गिक वाटत नाही. नवीन काहीतरी करण्यासाठी आपल्याकडे काहीच शिल्लकच नसतं असे मला वाटते.