ठळक मुद्दे२००५ मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती.
अभिनयाची उत्तम जाण असूनही बॉलिवूडमध्ये काम न मिळणारे अनेकजण आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे अभय देओल. अभयला फिल्म इंडस्ट्रीत १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण अलीकडे चित्रपटांत तो दिसेनासा झाला आहे. नाही म्हणायला, शाहरूखच्या ‘झिरो’मध्ये तो दिसला. पण यातील त्याची भूमिका इतकी लहान होती की, त्याच्याकडे फार कुणाचे लक्षच गेले नाही. असे का? असा प्रश्न अलीकडे अभयला विचारण्यात आला. यावर त्याने धक्कादायक उत्तर दिले.
होय, मिड डेला दिलेल्या ताज्या मुलाखतीत अभय देओलने अनेक खुलासे केलेत. यापैकीच एक म्हणजे, काम न मिळण्याचा. मला कुणीच काम देत नाही. मी ज्याप्रकारचे सिनेमे केलेत, तसे चित्रपट सध्या कुणीही बनवत नाही. खरे तर मी स्वत:ला कुठल्याही एका चौकटीत बांधून ठेवलेले नाही. एखादी गोष्ट मला आवडली तर मी ती करतो. चित्रपटांबद्दल माझी स्वत:ची एक आवड आहे. मला ज्याप्रकारच्या कथा आवडतात, त्या बहुतेक नव्या दिग्दर्शकाच्या असतात. मला आजपर्यंत ना कुठला पुरस्कार मिळाला, ना कुठला लँडमार्क प्रोजेक्ट. त्यामुळे सेलिब्रेट करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. तुम्ही मेनस्ट्रिम इंडस्ट्रीच्या विरूद्ध जात असाल तर तुम्हाला मनासारखे काम मिळत नाही, असे अभयने यावेळी सांगितले.
२००५ मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती. यातील अभयचा अभिनय लोकांना आवडला होता. यानंतर आहिस्ता-आहिस्ता, हनीमून ट्रॅव्हल्स प्राय.लिमिटेड, एक चालीस की लास्ट लोकल, देव डी, आयशा, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शंघाई, हॅपी फिर भाग जाएगी, नानू की जानू अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले. लवकरच तो चॉपस्टिक या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. अभय हा धर्मेन्द्र यांचा भाऊ अजीत देओल यांचा मुलगा आहे.