Join us

‘इंडियन आयडल 12’ वादावर सलीम मर्चंटचा खुलासा, वाचा काय म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 18:14 IST

काही दिवसांपूर्वी किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनी एक आरोप केला होता. मला शोमध्ये स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते, असा खुलासा करत त्यांनी इंडियन आयडलची पोलखोल केली होती. आता...

ठळक मुद्देमी स्पर्धकांच्या त्रुटींवर नेमकं बोट ठेवायचो, अर्थात माझ्या स्टाईलमध्ये, असेही सलीम म्हणाला.

छोट्या पडद्यावरचे रिअ‍ॅलिटी शो लोकांना आवडतात. या शोला जबरदस्त टीआरपी मिळतो. पण हे शो तितकेच वादही ओढवून घेतात. तूर्तास इंडियन आयडल 12 (Indian Idol 12) या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोनं असाच वाद ओढवून घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा शो वादात आहे. शोमध्ये स्पेशल गेस्ट बोलवून त्यांच्याकडून स्पर्धकांचे कौतुक करवून घेतले जात, असा एक आरोप या शोवर होतांना दिसतोय.

काही दिवसांपूर्वी किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनी असाच एक आरोप केला होता. मला शोमध्ये स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते, असा खुलासा करत त्यांनी इंडियन आयडलची पोलखोल केली होती. आता इंडियन आयडलमध्ये एकेकाळी जज म्हणून दिसलेला गायक व संगीतकार सलीम मर्चंट (Salim Merchant) यानेही अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

तू हा शो जज करत असताना तुलाही स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते का? असा प्रश्न त्याला एका मुलाखतीत विचारला गेला. यावर सलीमने होकारार्थी उत्तर दिले. हो, माझ्यासोबतही असे झाले आहे. मलाही असे सांगण्यात आले होते.  पण मी ते कधीच ऐकले नाही. मी निर्मात्यांचेऐकत नाही कदाचित म्हणून मी आज कोणत्याच शोचा जज नाही. मी अनेकदा स्पर्धकांचे कौतुक करायचोही. पण मला सांगितले म्हणून नव्हे तर मी त्यांच्यात ते बघत होतो. मी त्यांच्या कमतरता शोधण्याऐवजी त्यांच्या जमेच्या बाजू बघायचो. कुठल्याही स्पर्धकाचे कौतुक केले तर तो आणखी उत्तम काम करू शकतो, हे मला माहित आहे.  प्लीज तुम्ही निगेटीव्ह कमेंट्स देऊ नका, असे शोचे डायरेक्टर मला अनेकदा म्हणायचे. पण मी याबाबतील थोडा स्मार्ट आहे. मी स्पर्धकांच्या त्रुटींवर नेमकं बोट ठेवायचो, अर्थात माझ्या स्टाईलमध्ये, असेही सलीम म्हणाला.

टॅग्स :सलीम मर्चंटइंडियन आयडॉल