‘सुई-धागा’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून अनुष्का शर्मावर बनलेल्या मीम्सचा सोशल मीडियावर जणू पूर आलाय. आता मीम्स बनवणाऱ्या क्रिएटर्सच्या निशाण्यावर आलाय, तो ‘सुई-धागा’चा अभिनेता वरूण धवन. विशेष म्हणजे, खुद्द वरूणने आपल्यावरचे काही मीम्स शेअर केले आहे.‘सुई-धागा’च्या ट्रेलरमध्ये एक सीन आहे. यात वरूण कुत्र्याचा अभिनय करतोय. यावर मीम्स बनवणा-यांनी एक व्हिडिओ बनवला आहे.
या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये Who Let the Dogs out ग्रॅमी अवार्ड सॉन्ग सुरू दिसते. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, तो शेअर करण्यापासून वरूण स्वत:ला रोखू शकला नाही. कुणीतरी मला हा व्हिडिओ पाठवला आणि मी तो शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही, असे हा व्हिडिओ शेअर करताना वरूणने लिहिले आहे.
‘सुई-धागा’वरच्या या मीम्सनी एकीकडे लोकांचे मनोरंजन होत आहे. सोबतच ‘सुई-धागा’चे जोरदार प्रमोशनही होत आहे. अनुष्का शर्मावरचे मीम्स तर इतके विनोदी आणि हसून हसून पोट दुखवणारे आहेत की, सध्या ते ट्रेंड करताहेत.
‘सुई-धागा’ हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. 'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या ‘सुई-धागा’ या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत. ‘सुई-धागा’ या सिनेमातून हे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत. या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून मौजी असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल. दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.