काल शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. ही हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचे समोर आले. दरम्यान, आता अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर दुसरीकडे सलमानच्या कुटुंबीयांनीही जवळच्या लोकांना आणि इंडस्ट्रीतील मित्रांना भेटायला न येण्याबाबत विनंती केली आहे. सुरक्षेबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान दुःखी आहे. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे फक्त मित्र नव्हते तर कुटुंबासारखे होते. काही दिवसापूर्वी बाबा सिद्दिकी त्यांचा मुलगा झीशान यांच्यासोबत सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले होते.
काल रात्री गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने कालच रात्री लीलावती रुग्णालयात भेट दिली. यानंतर रात्रभर त्याने आमदार झिशान यांच्यासोबत संपर्क केला. सलमान खानने पुढील काही दिवसांसाठी त्याच्ये सर्व कार्यक्रम आणि वैयक्तिक बैठकाही रद्द केल्या आहेत.
सलमान खान सारखेच त्याच्या कुटुंबीयांचे बाबा सिद्दिकी यांचे चांगले संबंध होते. अरबाज खान आणि सोहेल खान देखील बाबा सिद्दिकी यांच्या खूप जवळ होते आणि अनेकदा त्यांच्या इफ्तार पार्ट्यांना हजेरी लावत होते.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडटे समोर आली आहे. या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे.काल रात्री सिद्दिकी यांची हत्या झाली. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही या टोळीतील सदस्याची असल्याची माहिती मिळत आहे. या पोस्टमध्ये, टोळीने दावा केला आहे की, त्यांना सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, परंतु बाबांच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी संबंध होते.
लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्याने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये "ओम जय श्री राम, जय भारत" असे म्हटले आहे. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "मला जीवनाचे सार समजते, मी शरीर आणि संपत्तीला धूळ समजतो. मी जे केले ते चांगले काम होते, मी जे केले ते मैत्रीचा धर्म आहे.", असंही यात म्हटले आहे.