महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृहांची अवस्था सध्या अतिशय बिकट होत चालली आहे. यावर मराठी रंगभूमीवरील कलाकारांनी वेळोवेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. नाट्यगृहातील मेकअपरूम, पाण्याचा होणारा अपव्यय, आसव्यवस्थेची दुरावस्था, बंद असणारे एसी या गैरसोयी कलाकारांनी वेळोवेळी प्रशासनाच्या नजरेस आणून दिल्या आहेत. ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी सही रे सहीचा प्रयोग सुरू असताना एसी बंद असल्यामुळे कलाकारांना असह्य उकाड्यात प्रयोग करावा लागला आणि ही बाब सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिनेता भरत जाधवने लोकांसमोर आणली. याला २४ तास उलटून गेल्यावरही त्याच नाट्यगृहात जैसे थेच परिस्थिती होती. अभिनेता आस्ताद काळे याच्या नाटकाचा रविवारी घाणेकर नाट्यगृहात प्रयोग होता. आणि नाट्यगृहातील प्रसाधनगृहात पाण्याचा अपव्यय होत होता. वाया जाणाऱ्या पाण्याचा हा व्हिडिओ आस्तादने सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला.
आस्तादने पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये कलाकारांसाठी असणाºया ग्रीन रूममधील प्रसाधनगृहात सतत वाहणारं पाणी स्पष्टपणे दिसत आहे. आणि यावर घाणेकर नाट्यगृहाची जबाबदारी असणाºया कर्मचाºयांचा कोणताही अंकुश दिसून येत नाहीये. आस्तादने यापूर्वीही मुंबई पुण्यातील दोन नाट्यगृहांच्या दुरावस्थेचे व्हिडियो पोस्ट केले होते. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील दुरावस्थेबद्दल ठाण्यातील स्थानिक कलाकारांनीही यापूर्वी आवाज उठवला होता. हे नाट्यगृह ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारित येते. मात्र महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या नाट्यगृहाच्या दुरावस्थेत भर पडली आहे. गेल्यावर्षी या नाट्यगृहातील स्लॅब कोसळला होता. सुदैवाने त्यावेळी नाटकाचा प्रयोेग सुरू नसल्याने कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही . त्यानंतर प्रशासनाने नाटयगृहाच्या नूतनीकरणासाठी हे नाट्यगृह अनेक दिवस बंद केलं होतं. मात्र वारेमाप पैसा खर्च करूनही अजूनही नाट्यगृहातील सेवा पूर्ववत का होत नाहीत ?असा सवाल रंगकर्मींकडून विचारला जातोय.
दरम्यान अभिनेते भरत जाधव यांच्या पोस्टनंतर ठाणे महापालिका प्रशानसनाकडून माफीनाम्याशिवाय काहीही पुढची हालचाल झालेली नाही. सलग दोन दिवस मराठी रंगभूमीवरील दोन कलाकारांनी घाणेकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल केलेल्या तक्रारीमुळे ठाणे पालिकेच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे सोशल मिडियावरून काढायला लोकांनी सुरवात केली आहे. त्याचबरोबर काहीजणांनी आपल्या भागातील असणाºया नाट्यगृहांच्या दुरावस्थेचे फोटो टाकण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह ही सरकारमधील नगरप्रशासन विभागाच्या अखत्यारित आणावीत जेणेकरून या नाट्यगृहांच्या देखभालीवर थेट सरकारचा अंकुश असेल. ही मागणी गेले कित्येक महिने सर्व रंगकर्मी एकत्र येऊन सरकारदरबारी करत आहेत. मात्र अजूनही सरकारकडून सकारात्मक असं कोणतंच पाऊल उचललं गेलेले नाही.