Join us

हृदयांतर चित्रपटाच्या टीमने लोकमत आॅफिसला दिली भेट

By admin | Published: July 07, 2017 5:28 AM

सुबोध भावे आणि मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका असलेला हृदयांतर हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या टीमने

सुबोध भावे आणि मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका असलेला हृदयांतर हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमतच्या आॅफिसला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या चित्रपटाबाबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. या चित्रपटाविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम फडणवीस सांगतात,‘ चित्रपटाची कथा कधीही कलाकारांनी वेगवेगळी सांगितली जाते. पण माझ्या चित्रपटातील नायक आणि नायिका सुबोध आणि मुक्ताच असणार हे माझ्या डोक्यात पक्के असल्याने मी कथा ऐकवण्यासाठी त्यांना एकत्र बोलावले होते. पहिल्याच भेटीत त्या दोघांनी या चित्रपटासाठी होकार दिला. विक्रम फडणवीस यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे. ते सांगतात, २००३ पासूनच एखादा चित्रपट दिग्दर्शित करायचे असे माझ्या डोक्यात सुरू होते. पण ही गोष्ट प्रत्यक्षात उतरायला काही वर्षं लागली. दिग्दर्शन करणे हे माझ्यासाठी स्वप्न असल्याने हृदयांतरच्या प्रवासाचा अनुभव माझ्यासाठी खूपच चांगला होता. या चित्रपटात मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात ती एका मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. याविषयी ती सांगते, ‘एका मुलीच्या आईची भूमिका साकारू की नाही याचा विचार मी कधीच केला नाही. कारण या चित्रपटाच्या कथेच्या मी प्रेमात पडले होते. माझ्यासाठी व्यक्तिरेखा ही महत्त्वाची असते. त्यामुळेच मी हा चित्रपट स्वीकारला. आयुष्य आनंदात जगा हा खूप छान संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि हीच गोष्ट मला खूप आवडली. आईची भूमिका साकारणे हे खूप कठीण असते. कारण आई असण्याचा अभिनय करता येत नाही. आई-मुलीचे नाते हे देहबोलीतून, नजरेतूनच समोरच्याला कळत असते. त्यामुळे या चित्रपटाचा माझा अनुभव खूपच वेगळा पण छान होता. सुबोध आणि मुक्ताच्या मुलीच्या भूमिकेत असलेल्या तृष्णिका शिंदेचा तर हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी ती सांगते, ‘चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी मुक्ता मावशी, सुबोध दादा यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करायला मला खूप भीती वाटत होती. पण त्यांनी मला खूप सांभाळून घेतले. अमित खेडेकर या चित्रपटात एका डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी तो सांगतो, हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. विक्रम फडणवीस हे डिझायनर म्हणून मला चांगलेच माहीत होते. मला या चित्रपटासाठी फोन करून बोलावण्यात आले होते. त्यांच्या आॅफिसला पोहोचेपर्यंत हा चित्रपट ते दिग्दर्शित करत आहेत याची मला कल्पना नव्हती. हा चित्रपट त्यांचा आहे हे कळल्यावर मला प्रचंड आनंद झाला होता. सोनाली खरे या चित्रपटात मॅरेज काऊन्सिलरची भूमिका साकारत आहे. याविषयी ती सांगते, ‘नात्यांकडे पाहाण्याचा खूप चांगला दृष्टिकोन या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा मला विक्रम यांनी बॅकराऊंड स्कोअरसह ऐकवली होती. त्यामुळे हा चित्रपट विक्रम यांच्या डोक्यात पूर्णपणे तयार आहे हे माझ्या तेव्हाच लक्षात आले होते. कोणत्याही दिग्दर्शकाने बॅकराऊंड स्कोअरसह चित्रपटाची कथा ऐकवली असल्याचे मी माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहिले आहे.